पुणे

जळोची : स्टेट बँकेचा भोंगळ कारभार नडला; एसटी कर्मचार्‍यांचे हाल सुरूच

अमृता चौगुले

जळोची; पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाकडून 88 हजार कर्मचार्‍यांचे वेतन गेली अनेक दिवसांपासून वेळेवर होत नाही, त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या घरातील चुली पेटणार कशा? असा प्रश्न निर्माण झाला होता. काही एसटी बसचालक आणि वाहक कर्मचार्‍यांनी आंदोलन करण्याच्या नोटिसासुद्धा महामंडळाला दिल्या होत्या. अशातच कवठेमहांकाळच्या एका कर्मचार्‍याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. त्यानंतर उशिरा का होईना शासनाने 223 कोटी इतकी रक्कम महामंडळाला दिली. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडियामधील तांत्रिक दोषामुळे अद्यापही अनेक एसटी कर्मचारी व अधिकार्‍यांना वेतन मिळाले नाही.

एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असल्यामुळे कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी चार वर्षे सरकारच्या बजेटमध्ये तरतूद केली जाईल आणि महिन्याला लागणारी पूर्ण रक्कम देण्याचे सरकारच्या वतीने न्यायालयात संपकाळात मान्य केले होते. जानेवारी महिन्यात 19 तारखेला एसटी महामंडळाने मागील सहा महिन्यांच्या वेतन रकमेतील थकीत रकमेसह या महिन्याच्या वेतनासाठी 1018.50 कोटी रुपयांची मागणी सरकारकडे केली होती.

तरीही 16 तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचार्‍यांना वेतन मिळालेले नव्हते. कर्मचारी चिंतेत असताना शुक्रवारी (दि. 17) शासनाकडून 223 कोटी रुपये इतकी रक्कम एसटी महामंडळाला मिळाली. त्यातील 208 कोटी रुपये इतकी रक्कम महामंडळाने स्टेट बँक ऑफ इंडिया व एसटी बँक या दोन्ही बँकांत भरणा केली.

या रकमेपैकी 90 टक्के एसटी कामगारांचे वेतन स्टेट बँकेतून केले जाते, तर 10 टक्के वेतन एसटी बँकेमार्फत दिले जाते. एसटी बँकेमार्फतचे वेतन कर्मचार्‍यांना वेळेवर मिळाले. मात्र, स्टेट बँकेमार्फत होणारे वेतन काही कर्मचार्‍यांना अद्यापही मिळालेले नाही. स्टेट बँक ऑफ इंडियातील तांत्रिक बिघाडामुळे वेतन कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा झाले नसले तरी बँकेचा भोंगळ कारभार याला जबाबदार असल्याचा आरोप एसटी कर्मचारी करीत आहेत.

बँकेने व्याज द्यावे
स्टेट बँकेकडून खातेदारांना कर्ज रक्कम वेळेवर न आल्यास तेवढ्या दिवसाचे व्याज वसूल केले जाते. मग आता महामंडळाकडून 17 तारीख रोजी वेतनाची रक्कम बँकेत भरणा करण्यात आली आहे. ती कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा झालेली नाही. जेवढे दिवस ही रक्कम त्यांच्या व्यक्तिगत खात्यात जमा होत नाही, तेवढ्या दिवसांचे व्याज बँकेने कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली.

SCROLL FOR NEXT