Sinhgad Road flyover opening date
पुणे: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील बहुप्रतीक्षित विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, या पुलाची एक मार्गिका नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे. पुलाच्या कामाची पाहणी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी उड्डाणपुलावर दुचाकीवरून सोमवारी (दि. 21) केली. पुढील आठवड्यात या पुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता असून, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पुणे (Pune) महापालिकेने 118 कोटी रुपये खर्च करून सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाइम थिएटर यादरम्यान तीन उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले. यातील राजाराम पूल चौकातील 650 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी झाले.
त्यानंतर आता 2120 मीटर लांबीच्या विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर यादरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. माणिकबाग ते हिंगण्यातील पेट्रोल पंप यादरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. तर, बाकीचे काम पूर्ण होण्यास अजून दोन महिने लागणार आहेत. (Latest Pune News)
विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर यादरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम मार्चअखेरीस पूर्ण झाले; पण पथदिवे व दिशादर्शक फलक लावणे, यासाठी एक महिना लावण्यात आला आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या उड्डाणपुलाची पाहणी केली असून, लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा रस्ता पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.