पुणे

कात्रज बोगदा-नवले पुलादरम्यानचा सेवारस्ता खुला

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सेवा रस्त्यावरील (सर्व्हिस रस्ता) असणारे 90 टक्के अतिक्रमण काढले असून, आता जडवाहनांसाठी महामार्गाच्या उजव्या बाजूला स्वतंत्र मार्गिका करण्यासंदर्भात खोदकाम करण्यास सुरुवात झाली आहे.

कात्रज बोगदा ते नवले पूल महामार्गादरम्यान होणार्‍या अपघातांचे सत्र लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खासगी संस्थेद्वारे सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार एनएचएआय, महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे. संबंधित यंत्रणांनी सुरू केलेल्या कामकाजाचा प्रत्यक्षात पाहणी आढावा नुकताच घेण्यात आला. त्यानुसार सेवा रस्त्यांवरील अतिक्रमण पूर्णतः काढून झाले आहे.

जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गकिा प्रस्तावित करण्यात आल्याने या कामासाठी खोदकाम करण्यात येत आहे. परंतु, या ठिकाणी विविध शासकीय, निमशासकीय, खासगी कंपन्यांच्या सेवावाहिन्यांचे अतिक्रमण असल्याचे नव्याने समोर आले आहे. त्यामुळे कामामध्ये व्यत्यय येत असल्याने संबंधित अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात भारत संचार निगम लि. (बीएसएनएल), महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी), महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एनएनजीएल), ग्रामपंचायत तसेच इतर खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या वाहिन्या असल्याने संबंधित कंपन्यांना सूचना दिल्या आहेत.

मुदतीच्या आत या वाहिन्यांचे अतिक्रमण काढले नाही, तर 'दी कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज' (लँड अँड ट्राफिक) कायदा 2002 अन्वये निष्कासित करण्यात येईल. तसेच यामध्ये कुठलीही सुविधा सार्वजनिक सुविधा खंडित झाल्यास एनएचएआय जबाबदार राहणार नाही, असा इशारा एनएचएआयचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT