पुणे

‘सोमेश्वर’च्या गळीत हंगामाची आज पवारांच्या हस्ते सुरुवात

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 61 वा गळीत हंगाम रविवार (दि. 9) पासून सुरू होत आहे.
माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते गव्हाणपूजन, कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन आणि सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाने नव्याने बांधलेल्या शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयांच्या दोन इमारतींचे तसेच मुलींसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. याशिवाय कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या तीन इमारतींचे आणि सांडपाणी प्रक्रिया (ईटीपी) उद्घाटनही अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

सोमेश्वर व माळेगाव कारखान्याची वार्षिक सभा नुकत्याच पार पडल्या आहेत. सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे माळेगाव कारखान्याला जोडण्यास सोमेश्वरच्या सभासदांनी मंजुरी दिली असली, तरीही याच मुद्द्यांवरून माळेगावच्या वार्षिक सभेत मात्र रणकंदन माजले होते. गोंधळात दहा गावे जोडण्याचा विषय मंजूर करत सत्ताधारी सभास्थानावरून निघून गेले होते.

त्याच ठिकाणी विरोधकांनी प्रतिसभा घेत दहा गावे जोडण्याच्या विषयाला कडाडून विरोध केला होता. सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्राच्या जिरायती भागातील अंजनगाव, जळगाव कप, जळगाव सुपे, देऊळगाव, कारखेल, भिलारवाडी, नारोळी, कोरोळी, कर्‍हाटी, खराडेवाडी ही दहा गावे माळेगावला जोडण्यास सोमेश्वरने मंजुरी दिली आहे. मात्र, सभासदांचा वाढता विरोध, सहकार न्यायालयात याबाबत दाखल केलेला दावा लक्षात घेता अजित पवारांच्या भूमिकेकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT