शिरूर : शिरूर शहरालगतच्या शिरूर ग्रामीण व बाबूरावनगर परिसरालाही बिल्डरांनी पार मातीत टाकण्याचे काम केले असून, तेथील परिस्थिती ही शहरापेक्षा वेगळी नाही. शिरूर शहर झपाट्याने वाढताना शहराचा पश्चिम भाग असलेला जुने शिरूर (रामलिंग), शिरूर ग्रामीण परिसर झपाट्याने वाढत गेला. रामलिंग रस्त्यावर ओम रुद्रा, शिक्षक कॉलनी, ओएसिस कॉलनी, औदुंबर कॉलनी, शिवरक्षा कॉलनी तसेच अनेक वसाहतींसह अनेक शाळा या ठिकाणी आल्या. मात्र, कुठल्याच नियमांचे पालन या ठिकाणी झालेले दिसत नाही. मोठ्या प्रमाणात या भागात अतिक्रमण होऊन अनेक राखीव जागेवर तसेच ओपन स्पेसवर शाळा व व्यापारी संकुले बांधली गेली आहेत.
शिरूर-भीमाशंकर रस्त्याच्या चारपदरी नियोजित रस्त्याची रुंदी सोडून बांधकाम होणे गरजेचे होते. मात्र, ते कुठेही पाळले गेलेले दिसत नाही. गुंठेवारी तसुध्दा अनेक ठिकाणी एका गुंठ्याची विक्री झालेली दिसत आहे, एक एक गुंठ्याची खरेदी होत नसल्याने अनेक नोटरीवर जागा देऊन या ठिकाणी बांधकामे झाली आहेत. दोन सोसायट्यांमध्ये रस्त्याचे अंतर सोडले गेलेले नाही. बांधकाम व्यावसायिकांनी तसेच जमीन खरेदी-विक्री करणार्या लोकांनी सर्व शासकीय नियम पायदळी तुडवत या ठिकाणी बांधकामे केली आहेत.
पावसाळ्यात चालण्यासाठी रस्ता नाही. प्रत्येक ठिकाणी पाण्याचे डबके तसेच ड्रेनेज व सांडपाणी यांचे नियोजन नाही, अशी अवस्था आहे.
बाबूरावनगरची सुध्दा अशीच वाईट अवस्था आहे. अर्धा भाग शिरूर ग्रामीण व अर्धाभाग तर्डोबाचीवाडी या ग्रामपंचायतींमध्ये येतो. सर्वांत जास्त नियमांची पायमल्ली कुठे झाली असेल तर ती बाबूरावनगरमध्ये. अनेक ओपन स्पेसमध्ये व्यावसायिक इमारती व शाळा, फ्लॅट बांधण्यात आले आहेत. रस्त्याची कुठलीही सोय नाही. बिल्डरांनी कुठल्याही सोयीसुविधा न देता नागरिकांची लूट केली आहे. कचरा डेपो नाही, पाण्याची गंभीर समस्या, अशा अनेक बाबींची या ठिकाणी पूर्तता नाही. जमिनीला आलेल्या अस्मानी भावामुळे या ठिकाणी अनेकांची चांदी झाली. चाळीस लाख गुंठ्यापर्यंत भाव गेला, त्याचा फायदा घेत शासनाची फसवणूक करीत अनेक ओपन स्पेस गिळंकृत केल्या व त्यावर करोडो रुपये कमविले आहेत.
बांधकाम व्यावसायिकांना अधिकार्यांचा धाक नाही
शिरूर शहराच्या आसपास सर्वच ठिकाणी अशी फसवणूक झाल्याची भावना नागरिकांमध्ये असून, यावर मपीएमआरडीफने कारवाई करणे गरजेचे आहे. शासनाचा व अधिकार्यांचा धाक बांधकाम व्यावसायिकांना राहिला नसून यापुढेही नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे.