पुणे

पुणे : सत्ताधार्‍यांवर सभागृहात शस्त्रक्रिया करणार: डॉक्टरांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'रावणाविरोधात लढण्यासाठी प्रभू श्रीरामांनी छोटी छोटी सेना एकत्र करून जसा विजय मिळविला तसाच विजय मिळविण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेने केला आहे. सत्ताधार्‍यांवर सभागृहात शस्त्रक्रिया करून हुकूमशहा पद्धतीने केले जाणारे कायदे रद्द करण्यास भाग पाडून लवकरच डॉक्टरांचे टेन्शन दूर करणार आहे,' असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी (दि. 1) पुण्यात सांगितले. पुणे शहर काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलच्या वतीने राजीव गांधी ई-लर्निंग इमारतीतील साहित्यसम—ाट विजय तेंडुलकर नाट्यगृहात डॉक्टरांच्या मेळाव्यात पटोले बोलत होते. या वेळी माजी मंत्री आ. डॉ. विश्वजित कदम, अरविंद शिंदे, आबा बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पटोले म्हणाले, 'आधी बारावीनंतर वैद्यकीय विभागाकडे जाता येत होते. आता 'नीट'ची परीक्षा द्यावी लागते. ती नीट नसून राजकारण्यांचे भले करणारी 'नीट' आहे. देशात आमची सत्ता आली तर सर्वप्रथम 'नीट' रद्द करून सर्वसामान्यांना वैद्यकीय शिक्षण सोप्या पद्धतीने कसे घेता येईल, अशी सोय करून देऊ. 'नीट'मुळे गुणवत्ता असून, केवळ पैशाअभावी डॉक्टर होण्याऐवजी अनेक मुले-मुली जीवनयात्रा संपवतात.

बाहेरच्या देशात आरोग्य व्यवस्थेत कोणालाच खर्च करण्याची गरज पडत नाही. हेच आपल्या देशात का होऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला. आ. डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या समस्या किती गंभीर आहेत, हे आज समजले. सभागृहात या विषयावर आवाज उठवून कायद्यात सुधारणा करण्यास भाग पाडू. राहुल गांधी यांच्या यात्रेदरम्यान डॉक्टरांची भेट कशी घालून देता येईल? याचा विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT