पुणे

पुणे : सिंहगड घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका वाढला

अमृता चौगुले
खडकवासला :  पुढारी वृत्तसेवा : सिंहगड परिसरात मंगळवारी झालेल्या संततधार पावसामुळे घाटरस्त्यावर दरडींचा मुरूम व दगडगोटे निखळले. तसेच पुणे दरवाजा मार्गाचा भरावही खचला आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास या रस्त्यावर धोकादायक दरडी कोसळण्याचा धोका आहे. यामुळे वन विभागाने पर्यटकांना  सुरक्षेचे आवाहन केले आहे.
वन विभाग व बांधकाम विभागाच्या वादामुळे गेल्या दोन वर्षांपासून घाटरस्त्यावरील पहिल्या वळणावरील, तसेच इतर ठिकाणच्या दरडी संरक्षित करण्याचे काम ठप्प आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. पावसाळ्यात घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका असूनही प्रशासनाचे दरडी संरक्षित करण्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे.
किल्ल्याच्या परिसरात मंगळवारी सकाळपासून संततधार सुरू असल्याने दुपारी दोनच्या सुमारास घाटरस्त्यावरील पहिल्या वळणावर असलेल्या दरडीचा मुरुम व दगडगोटे निखाळले. वाहतूक सुरू असली, तरी  दरडीच्या भागात ये-जा करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पुणे दरवाजाखालील बुरुजावरील पाऊलवाटेचा भरावही कोसळला आहे. पावसामुळे पायी मार्गावर पाणी वाहत असून, ढासळलेल्या संरक्षक भिंतीतून पाण्याचे लोट वाहत आहेत.
वनरक्षक संदीप कोळी म्हणाले, 'दुपारी दोनच्या सुमारास पहिल्या वळणाजवळ अकराशे नंबरच्या पॉईंटवर दरडीचा काही भाग निखळला असून, दगड व मुरूम रस्त्यावर आला आहे. हा सर्व भराव रस्त्याच्या एका बाजूला असल्याने वाहतूक सुरू असून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.'
बांधकाम खात्याला घाटरस्त्यावरील दरडी, तसेच पुणे दरवाजा मार्गाच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, अद्यापही  दुरुस्तीचे काम केले नाही. कोसळल्या दरडीचा भाग तातडीने बाजूला हटविण्यात येणार आहे.
                                                                     – प्रदीप सकपाळ,  वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे वन विभाग
वनखात्याने पैसे दिले असले, तरी त्यांच्या मालकीच्या जमिनीवर काम करण्यासाठी 'नाहरकत पत्र' दिले नाही. त्यामुळे निधी असूनही तांत्रिक मंजुरी मिळाली नाही. याबाबतचे पत्र मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून तातडीने काम सुरू करता येईल.
                                                                      – नामदेव राठोड,  शाखा अभियंता, हवेली बांधकाम विभाग 
हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT