पुणे

फ्लेमिंगोंचा परतीचा प्रवास रखडला

अमृता चौगुले

पळसदेव : उजनी धरणाच्या परिसरातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांनी आपल्या परतीच्या प्रवासाला प्रारंभ केला आहे. पक्षिअभ्यासकांनी ही माहिती दिली. दरवर्षी, हिवाळा सुरू झाला म्हणजे नोव्हेंबर महिन्यात फ्लेमिंगो पक्षी थव्याने उजनी धरण परिसरात येऊन दाखल होतात. लांब पल्ल्याचा प्रवास करून धरण परिसरात आल्यानंतर प्रथम पळसदेव, काळेवाडी, डाळज, कुंभरगाव, डिकसळ आदी विस्तृत पाणलोट परिसरात अनुकूलता पाहून ते विविध ठिकाणी विखरून राहतात. तीन-चार महिन्यांच्या वास्तव्यात उदरनिर्वाह करीत हे पक्षी वावरतात. गटागटाने दिवसभरात उड्डाण घेत एकमेकांच्या संपर्कात राहून खाद्य मिळवत असतात.

स्थलांतर करून येताना हे पक्षी आपल्या प्रौढावस्थेतील पिलांना सोबत घेऊन येतात. करड्या रंगाची व आकाराने लहान असलेली पिले पालक पक्ष्यांपासून सहज ओळखता येतात. ही पिले सतत पालक पक्ष्यांचे आश्रय घेत व सुरक्षितता बाळगत कमाल क्षमतेने खाद्य खाण्यास सक्रिय असतात. धरणाच्या पाण्यात आढळणार्‍या आटोलिया या विशिष्ट तांबड्या शेवाळाच्या सेवनाने या पिलांना गुलाबी व शेंदरी रंगाचे रूप धारण होते.

तीन-चार महिन्यांतील वास्तव्यानंतर पिले आकाराने मोठी होतात. नजाकतदार रंग प्राप्त झाल्यावर पालक पक्ष्यांपासून विलग होऊन स्वतंत्र जीवन जगण्यास तत्पर होतात. नंतर पावसाळ्याचा अंदाज घेत परतीच्या प्रवासाला लागतात.

पळसदेव बनले फ्लेमिंगो सिटी
दरवर्षी परतीच्या प्रवासापूर्वी संपूर्ण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विखरलेले शेकडो फ्लेमिंगो मे महिन्यात पळसदेव परिसरात जमतात. पावसाळ्याचा अंदाज घेत या ठिकाणी हे पक्षी चरण्यात मग्न असतात. मे महिन्यात खालावलेल्या पाण्याच्या पातळीमुळे हे ठिकाण या पक्ष्यांच्या उदरनिर्वाहासाठी पोषक ठरते. पाण्यापासून मुक्त झालेल्या या परिसरात फ्लेमिंगोंचे अनेक समूह महिनाभर तळ ठोकतात. या कारणामुळे हा परिसर फ्लेमिंगोने गजबजतो व पक्षीनिरीक्षकांना "फ्लेमिंगो सिटी" अवतरल्याची प्रचिती मिळते.

हिवाळ्यात निर्माण झालेला वातावरणातील बदल त्यांच्या प्रवासाला बाधा ठरली होती. ऐन दिवाळीत पडत असलेल्या धो-धो पावसामुळे हे पाहुणे पक्षी उशिराने व कमी संख्येने आले. या वर्षी पाऊस लांबल्याने या पक्ष्यांच्या परतीचा प्रवाससुध्दा  रखडला आहे. वर्षभराच्या वातावरणातील अनिश्चितेमुळे पक्षीसुद्धा त्रस्त झाले आहेत.
                                                 – डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षिअभ्यासक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT