पुणे

पुणे : प्लास्टिक फुलांमुळे सुकली खरी सुगंधी फुले

अमृता चौगुले

शंकर कवडे

पुणे : हुबेहूब फुलांसारख्या दिसणार्‍या, कधीच न सुकणार्‍या तसेच वर्षानुवर्षे वापरता येणार्‍या प्लास्टिकच्या फुलांच्या माळा पुणेकर मोठ्या प्रमाणावर घेऊ लागल्याने खर्‍या, सुगंधी फुलांची मागणीच घटल्याचे आणि त्यामुळे शेवंतीसारख्या फुलांचे दर किलोला 120 वरून 40 रुपयांपर्यंत घसरल्याचे दै. 'पुढारी'च्या पाहणीत आढळून आले आहे. मार्गशीर्ष महिन्यात फुलांचा बाजार तेजीत असल्याने उत्पन्नाच्या आशेने मोठ्या प्रमाणावर पीक घेणार्‍या शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.

मार्गशीर्ष महिना हा खरे तर व्रतवैकल्ये आणि लग्नसराईचा असतो. पुजेसाठी हार, केसांमध्ये वेणी माळण्यासाठी तसेच लग्नसराईमध्ये सजावटीच्या माळांसाठी शेवंतीची फुले मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्यामुळे दरवर्षी शेवंतीच्या फुलांना चांगली मागणी असते. परिणामी शेतकरी या काळात शेवंतीची मोठी लागवड करतात. यंदाही शेतकर्‍यांनी मोठी लागवड केली. मात्र, त्यांना नेहमीचा वीस टक्केही दर मिळाला नाही. यामुळे बाजारातील शेवंतीचे किलोचे दर 10 ते 40 रुपयांपर्यंत घसरले आहेत.

शेवंतीच्या या घसरणीच्या कारणांचा शोध दै. 'पुढारी'ने घेतला. प्लास्टिकची खराब न होणारी फुले आणि त्यांच्या माळा घेण्याकडे पुणेकरांचा कल वाढला आहे. ही फुले अनेक वर्षे टिकतात आणि धुऊन पुन्हा वापरता येतात. त्याचप्रमाणे पूर्वी महिलावर्ग मार्गशीर्षाचे व्रत दर गुरुवारी करीत. आता धावपळीच्या जीवनक्रमामुळे पहिल्या आणि शेवटच्या गुरुवारीच हे उपवास करण्यात येतात. त्यातही असे व्रत करणार्‍या महिलांची संख्या कमी झाली असून आधुनिक तरुणी या व—ताकडे पाठ फिरवत असल्याचेही दिसून आले आहे, त्यामुळे शेवंतीची मागणी घटली आहे.

सुगंध नको, दिखाऊपणा हवा…
फुले घेतली जातात ती दोन कारणांसाठी. ती दिसतात सुंदर आणि त्यांचा सुगंध प्रसन्नपणा आणतो म्हणून. पण, आता केवळ दिखाऊ आणि कृत्रिम अशा सगळ्याच वस्तूंकडे पुणेकरांचा ओढा असल्याने सुगंधाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. मात्र, अस्सल फुलांना आणि त्यांच्या सुगंधाला ते मुकत आहेत, असे निरीक्षण जाणकारांनी नोंदविले.

शेवंतीच्या मागणीत वाढ होण्याच्या अपेक्षेने याआधी यवत, माळशिरस भागाप्रमाणेच यावर्षी नगर, शिरूर, सातारा, वाई परिसरातील शेतकर्‍यांनीही मोठ्या प्रमाणात शेवंतीची लागवड केली. मात्र, फुलांची मागणीच घटली असल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे.

                                                          – सागर भोसले, फुलांचे व्यापारी

उत्पादन खर्चही निघत नसल्याने फुलांची तोडही करता येत नाही. त्यामुळे जवळपास 70 ते 80 टक्के फुले तोडीविना शेतातच खराब होत आहेत. मागणीच नसल्याने फूल बाजारापर्यंत जाण्याचा खर्च टाळण्यासाठी यंदा आम्ही बांधावरच व्यापार्‍यांना फुले विकली. मात्र, त्यांचा पडलेला दर आम्हाला परवडत नाही.

                                                        – आप्पा गोराडे, शेतकरी, यवत

दर कमी होण्याची कारणे?
आर्टिफिशियल फुलांचा वाढलेला वापर
जिल्ह्यात लागवडीत झालेली वाढ
व्यापारीवर्गाकडून बांधावरून थेट खरेदी
व्रत करण्याचे कमी झालेले प्रमाण

SCROLL FOR NEXT