नरेंद्र साठे
पुणे : 'वारीला येण्याच्या अगोदर आम्ही सगळी मंडळी शेतीची कामं उरकून येत असायचो. पण, यंदा पावसानं ताण दिल्यानं लैच अवघड झालंय. पार पाणी पळालंय तोंडचं. त्यात वारी बी लवकर आलीये, वारी चुकवता तर येईना. माझ्या संग दरवर्षी असतेत ती लोकं पेरण्यामुळं अजून आली पण नाहीत. आत्ताच त्यांना फोन केलेला. पण, वाटेत मधी कुटंतरी येतो म्हणालेत…' हे शब्द आहेत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात चालणार्या अंबडहून आलेल्या रामेश्वर चोरमाले यांचे.
जूनचा महिना अर्धा संपत आला, तरी अजूनही राज्यात पावसचा थेंब नाही. श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी अगोदर शेतीची कामे पूर्ण करून सहभागी होतात. मात्र, या वर्षी पाऊसच न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. या वर्षी पाऊस अद्याप झालाच नसल्याने सोयाबीन, बाजरी, मका सगळ्यांच्याच पेरण्या खोळबंल्या. त्यात प्रचंड ऊन असल्याने दोन्हीही प्रस्थान सोहळ्यांमध्ये नेहमी दिसणारी वारकर्यांची संख्या या वर्षी कमी असल्याचे दिसून आले.
खरिपात आमच्या इथं बाजरीचं पीक घेतलं जातं. वारीला यावं की नाही, अशी अवस्था झालेली. आता जे होईल ते म्हणून आलो. पण, आता वाटतंय की पीक नाही झालं तर खायची आबाळ ठरलेली.
– नारायण तांबे, वाईसेवाडी
मी अकरा वर्षांपासून वारीत सहभागी होतो. पण, यंदा पहिल्यांदाच शेतीची काळजी वाटतेय. लेक लहान आहे; पण त्याला सांगून आलोय सगळं कसं कसं करायचं ते. दरवर्षी मका पेरून येत असतो. ऊन जास्त असलं तरी तुकोबांच्या जयघोषात ते जाणवत नाही.
– विठ्ठल चव्हाण, काझड, इंदापूर
कापूस लावायचा आहे. पण, त्याला थोडीफार ओल पाहिजे. कापसाचं वावर तयार करून ठेवलंय. आता पाणी पुरते का नाही, याची चिंता आहे. पाऊस व्हावा एवढं एकच मागणं पांडुरंगाला आहे. दरवर्षी वारीच्या अगोदर मशागती करून, पेरण्या, कापसाची लागण व्हायची, यंदा तसं नाही.
– भगवान काकडे, घोंगरडे हातगाव, जालना
मका पेरून आलोय. रान ओलं केलं नदीच्या पाण्यावर. पण, ते पाणी कुठवर पुरणार? पाऊस नाही झाला तर आहे तो ऊस जळून जायचा. मका पेरलाय खरं; पण जळून जाणार. वारीमध्ये यायचं म्हणून घेतलं पेरून. पाऊस येईल असं म्हणत्यात; पण त्यो काय येईना झालाय.
– मारुती मोहिते, उंबरे, पंढपूर
हेही वाचा