पुणे

पुणे : एमपीएससी परीक्षार्थींचे आंदोलन सुरूच

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पुण्यात सुरू असलेले स्पर्धा परीक्षार्थींचे आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरूच होते. परीक्षा पद्धतीमधील बदल 2025 पासून लागू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना केवळ आश्वासने मिळत असल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेतील बदल 2025 पासून करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारांना आश्वासन दिले आहे. या आंदोलनास राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी भेटी देत उमेदवारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. या प्रसंगी हजारो उमेदवारांनी उपस्थिती लावत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

या वेळी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आंदोलनस्थळीच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. या वेळी आम्ही उमेदवारांच्या बाजूने आहोत. लवकरच नवे बदल 2025 पासून लागू होतील. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी उमेदवारांना आश्वासन दिले. मात्र, यासंदर्भात ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी सांगितले. आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 पासून यूपीएससीच्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाच्या निर्णयास विरोध नाही, पण त्याची अंमलबजावणी 2025 पासून करावी, अशी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवारांची मागणी आहे.

SCROLL FOR NEXT