बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: परिसरात झालेल्या दमदार पावसाने बेल्हे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीचा कठडा कोसळला. याबाबत समजलेली माहिती अशी की, बेल्हे येथे पुणे जिल्हा परिषदेची जीवन शिक्षण मंदिर नावाची प्राथमिक शाळा आहे. परिसरात झालेल्या पावसामुळे या शाळेच्या संरक्षक भिंतीच्या कठड्याचा काही भाग पडला. सुदैवाने शाळा बंद असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, उर्वरित संरक्षक भिंतीला तडे गेल्याने तीही कोसळण्याची शक्यता ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.
लोकल बोर्डाच्या काळात येथे सुरू झालेल्या प्राथमिक शाळेच्या दुसर्या नूतन इमारतीचे काम पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या या संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले होते. पावसामुळे शाळेच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. ठेकेदाराने केलेले या संरक्षक भिंतीचे काम दर्जाहीन होते. या दर्जाहीन कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.