पुणे; पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले करण्यात आले आहे. कारागृहात एकत्र आलेले अनेक गुन्हेगार बाहेर येऊन गुन्हे करत असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यास त्यावर उपाययोजना करणे शक्य होणार आहे. त्यासाठी आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध बाबींवर कारागृहातील जीवनाचा अभ्यास करता येणार आहे.
अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. राज्यातील अनेक विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामाजिक जीवनात मानवाच्या वागणुकीचा अभ्यास करण्यासाठी सामाजिक संशोधनाचा वापर केला जातो.
कोणीही मानवी वर्तनाबद्दल अंदाज लावू शकत नाही.
परंतु, सामाजिक संशोधनामुळे मानवी व्यवहार आणि समाजाच्या संदर्भात बर्याच गोष्टींचा ऊहापोह होऊ शकतो. त्याकरिता विविध विद्यापीठांतील व महाविद्यालयांतील विद्यार्थी विशेषत: लॉ तसेच एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमांशी संबंधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव कारागृहाला भेट द्यावी लागते. विविध विषयांवर राज्यातील तसेच देशातील विद्यापीठांमार्फत संशोधन करण्यात येते.
कारागृहातील कैद्यांवरदेखील संशोधन करण्यासाठी विद्यार्थी संशोधन विषय निवडत असतात. त्याकरिता त्यांना कारागृहाला भेट देऊन तेथील कैद्यांची माहिती घेण्याची आवश्यकता भासत असते. हे लक्षात घेऊन गुप्ता यांनी नोंदणीकृत संस्था व विविध विद्यापीठ, महाविद्यालयातील विद्यार्थी यांना संशोधनाकरिता कारागृह भेटीची परवानगी देण्याबाबतचा आदेश काढला आहे.
कारागृह विभागासाठी आक्षेपार्ह असलेला विषय वगळता इतर बाबींवर संशोधन करता येणार आहे. त्यासाठी अटींवर परवानगी देण्यात येणार आहे. या संशोधनाद्वारे कैद्यांच्या समस्या, मानसिक स्थितीचा अभ्यास करता येणार आहे. त्याचा कैद्यांच्या सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी उपयोग होऊ शकणारआहे.
गटाने देता येणार भेट
अनेकांना कारागृह पाहण्याची इच्छा असते. महाविद्यालयातील जास्तीतजास्त 35 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव कारागृह भेटीची परवानगी देण्याचा आदेश देण्यात आला आहे. कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करून गटाने कारागृहाला भेट देता येणार आहे.