पुणे: फेब्रुवारी महिन्यातच कडाक्याच्या उन्हाची चाहुल लागली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात लिंबाला मागणी वाढली असून, बाजारात घटलेली आवक आणि मागणी यांमध्ये लिंबाचे आत्ताच भाव गगनाला भिडले असल्याची माहिती लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.
गुलटेकडी मार्केट यार्डमधील फळ बाजारात लिंबाची केवळ 900 ते 1200 गोणीच आवक झाली असून, प्रतिगोणीला तब्बल 400 ते 1000 रुपये भाव मिळाला आहे. बाजारात आलेल्या लिंबाची आवक ही सोलापूर आणि अहिल्यानगरमधून होत असून, पुणे शहर आणि पिंपरीतून जास्त मागणी आहे.
गेल्या वर्षी उन्हाचा तडाखा मार्चनंतर वाढला होता. त्या पटीने एक महिना आधीच उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबाची आवक त्यामानाने घटली असल्याचे रोहन जाधव यांनी सांगितले.सध्या बाजारात आलेल्या लिंबाला गुर्हाळचालक, लोणचे करणार्या कंपनी आणि घरगुती वापरासाठी अधिक मागणी आहे.
दिवसेंदिवस लिंबाची मागणी वाढत जाणार असून, त्या पटीत लिंबाची आवक घटणार आहे. त्यामुळे आगामी काळात लिंबाचे भाव आणखी वाढणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.