लसणाच्या स्वस्ताई ने फोडणी खमंग; तीन महिन्यांत किलोमागे दर चारशे रुपयांनी घसरले Garlic Price
पुणे

लसणाच्या स्वस्ताई ने फोडणी खमंग; तीन महिन्यांत किलोमागे दर चारशे रुपयांनी घसरले

किरकोळ बाजारात किलोला पन्नास ते दीडशे रुपये दर

पुढारी वृत्तसेवा

शंंकर कवडे

पुणे: अन्नाला खमंग, स्वादिष्ट आणि रुचकर चव आणणार्‍या लसणाचा हंगाम बहरल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात लसणाची आवक वाढू लागली आहे. बाजारात देशी लसणासह उटी लसूणही मोठ्या प्रमाणात दाखल होत असून, तीन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात 550 रुपये किलोपर्यंत गेलेले दर आता शंभर रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

तर, हातगाड्यांवर शंभर रुपयांना दीड किलो याप्रकारे लसणाची विक्री सुरू आहे. तीन महिन्यांनंतर लसणाचे दर चांगलेच खाली आल्याने गृहिणीवर्गाकडून लसणाच्या खरेदीसाठीही गर्दी होऊ लागली आहे.

देशातील गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांत मोठ्या प्रमाणात लसणाचे उत्पादन घेतले जाते. मागील दोन वर्षे लसणाला दर न मिळाल्याने गुजरातमधील शेतकर्‍यांनी लसणाऐवजी अन्य पिकांना प्राधान्य दिले होते.

घटलेले उत्पादन, त्यात अवकाळी पावसाचा परिणाम यामुळे राज्यातील बहुतांश बाजारपेठांमध्ये लसणाचा तुटवडा जाणवत होता. परिणामी, शहरातील घाऊक बाजारात लसणाचा क्विंटलचा दर 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत पोहचला होता.

मात्र, सद्य:स्थितीत गुजरात व मध्य प्रदेशमधून दररोज सरासरी दहा ते पंधरा टेम्पोमधून लसूण बाजारात दाखल होऊ लागला आहे. मागणीच्या तुलनेत सध्या आवक जास्त असल्याने लसणाचे दर उतरणीला लागले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 हजार 500 ते 8 हजार रुपयांवर पोहचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही दर दिडशेच्या आत आले आहेत.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत देशीसह उटी लसूण मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागला आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने दरात घट झाली आहे. ग्राहकांना स्वस्तात लसूण उपलब्ध झाला असून, ते खरेदी करण्यासाठी गर्दीही होऊ लागली आहे.
- सुरज संचेती, लसणाचे व्यापारी, मार्केट यार्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT