ताटातून कापरी पापलेट गायब; चक्क दोन हजार रुपये किलो भाव Pudhari
पुणे

ताटातून कापरी पापलेट गायब; चक्क दोन हजार रुपये किलो भाव

सिंगापूर येथील चायनीज फेस्टिव्हलसाठी कापरी परदेशात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मासळीमध्ये पापलेट म्हटले तर सामिष खवय्यांची चंगळच. त्यामध्ये कापरी पापलेट म्हटले तर सर्वांच्या डोळ्यांसमोर मोठा पापलेट चमकून जातो. सध्या याच कापरीचा बाजारात तुटवडा जाणवू लागला आहे. थंडीच्या कडाक्यामुळे जाळ्यात कमी प्रमाणात मासळी येत असल्याने बाजारात मासळीची आवक घटली आहे.

त्यात सिंगापूर येथील चायनीज फेस्टिव्हलसाठी देशभरातील किनारपट्टीवरून कापरीची निर्यात होत असल्याने शहरात कापरी दिसेनासा झाला आहे. ज्या ठिकाणी कापरी तुरळक स्वरूपात उपलब्ध आहे त्या ठिकाणी कापरीचे किलोचे दर 2 हजार 200 रुपयांपर्यंत गेल्याचे चित्र आहे.

सिंगापूरमध्ये 28 जानेवारी ते 6 फेब्रुवारी यादरम्यान चायनीज फेस्टिव्हल आयोजित केला जातो. जवळपास 9 ते 10 दिवस चालणार्‍या या फेस्टिव्हलमध्ये कापरी पापलेट आवडीने खाल्ला जातो. चीन तसेच सिंगापूरमध्ये कापरी जातीची मासळी मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्या तुलनेत भारतातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर कापरी आढळण्याचे प्रमाण जास्त आहे.

परिणामी, देशाच्या किनारपट्टीवरून कापरी पापलेटची खरेदीदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करून तो सिंगापूर येथे पाठविण्यात येत आहे. चायनीज फेस्टिव्हल जरी जानेवारीअखेरच्या टप्प्यात असला, तरी निर्यातदारांकडून महिनाभर आधीपासून मासळी खरेदी करून ती पाठवून त्या ठिकाणी असलेल्या शीतगृहात ठेवण्यात येते. दरम्यान, थंडीमुळे मासळी कमी प्रमाणात जाळ्यात येत आहे. त्यात कापरीची खरेदी वाढल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये कापरी दिसेनासा झाला आहे.

मुंबई, कोलकाता अन् आंध्रतून सर्वाधिक निर्यात

मुंबई, कोलकाता आणि आंध्र प्रदेशातील मोठे व्यापारी कापरीची निर्यात सिंगापूरला करतात. शहरातील मासळी बाजारात साधारणपणे खोल समुद्रातील दहा टन मासळीची आवक होत आहे. त्यात केवळ 50 ते 100 किलो एवढी कापरीची आवक होत आहे.

सिंगापूरमधून वाढलेली मागणी तसेच त्यातुलनेत होणारी कापरीची अत्यल्प आवक पाहता किरकोळ तसेच घाऊक बाजारात कापरीचे भाव वाढले आहेत. घाऊक बाजारात 2 हजार ते 2 हजार 200 रुपये प्रतिकिलो दराने कापरीची विक्री होत आहे. घाऊक बाजारात अन्य पापलेटचे दर आकारानुसार 1000 ते 1800 रुपये किलो आहेत.

खवय्यांकडून मागणी वाढल्यानंतर देशभरातील किनारपट्टीवरून कापरीची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत कापरीची आवक तशी कमी आहे. देशभरातील प्रमुख मासळी बाजारात होणारी एकूण आवक विचारात घेता कापरीची आवक तुलनेने कमी आहे. त्यामुळे स्थानिक किरकोळ तसेच घाऊक बाजारात कापरीचे दर जवळपास चाळीस टक्क्यांनी वाढले आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कापरीची ही दरवाढ कायम राहील. त्यानंतर दर काहीसे कमी होतील.
- विजय परदेशी, अजय सी फुड्स, गणेश पेठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT