पुणे

पुणे : चपाती आणि भाकरीचाही चंद्र महागला ! ज्वारी, गहू, बाजरीचा दर किलोमागे 8 ते 20 रुपयांनी वाढला

अमृता चौगुले

शंकर कवडे :

पुणे : सकाळच्या न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत ताटात हमखास दिसणारी चपाती अन् भाकरीही महागाईच्या कचाट्यात आल्याने गोरगरिबांसह सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. लहरी हवामानासह रशिया-युक्रेन युद्ध, निर्यातीत झालेली वाढ आदी विविध कारणांमुळे गहू, ज्वारी आणि बाजरीच्या दरात किलोमागे दर्जानुसार 8 ते 20 रुपयांची वाढ झाली. या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असून, खर्च भागविताना गृहिणींची तारांबळ उडत आहे.

गहू किलोमागे आठ ते बारा रुपयांनी वाढला आहे. ज्वारी वीस रुपयांनी, तर गरिबांच्या ताटात असलेली बाजरी अकरा ते बारा रुपयांनी महागली आहे. आमच्या घरात चार जण आहेत. आम्हाला 15 किलो गहू आणि 5 किलो ज्वारी लागते. म्हणजेच महिन्याला दोनशे रुपयांनी खर्च वाढला आहे. हातावर पोट असलेल्या घराने हा वाढीव खर्च कसा पेलायचा, असा प्रश्न मोनिका गावडे-खलाने यांनी विचारला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार बाजारात राज्यासह परराज्यातून गहू, ज्वारी व बाजरीची आवक होते. बाजारात राजस्थान येथून महिन्याला 30 ते 32 टनांच्या चार गाड्या तसेच गुजरात येथून 20 ते 25 टनांच्या दोन गाड्यांमधून बाजरी बाजारात दाखल होते; म्हणजेच 55 ते 60 टन बाजरी पुण्यात येते.

राज्यातील जालना, जामखेड, अहमनगर, कडा, बार्शी, करमाळा येथून गावरान ज्वारी; तर आंध्र प्रदेशातून एकूण 30 टन ज्वारी रोज बाजारात येते. मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, राजस्थानातून रोज 50 टन गहू पुण्यात येतो. हीच आवक दुप्पट तिपटीने असते. मात्र, गेल्या काही महिन्यांत ही आवक कमी होत आहे. त्या तुलनेत मागणी मात्र वाढलेली असल्याने भाव चढे झाले आहेत.

चपातीपेक्षा भाकरी खाण्याला पसंती
स्थूलपणा कमी करण्यासाठी ज्वारी, बाजरीच्या भाकरीचा आग्रह वाढता आहे. त्यामुळे शहरामध्ये ज्वारीची मागणी दुपटीने वाढली आहे. अधिक पैसे देऊन राज्यातून ज्या ठिकाणांहून ज्वारी येत होती तिथून ती पुरेशी मिळत नाही. पुण्याइतकीच राज्यातील अन्य भागांतही ज्वारीला वाढती मागणी आहे. ज्वारीचे दर अधिक असल्याने शेतकरीवर्गाकडून कमी प्रमाणात ज्वारी बाजारात पाठविण्यात येत आहे. ज्या ठिकाणी दर जास्त त्या ठिकाणी माल पाठविण्याकडे उत्पादकांचा कल असल्याचे व्यापारी सुदर्शन भंडारी यांनी सांगितले.

गहू
कोरोना काळात केंद्र सरकारने साठवणुकीतील गव्हाचे मोफत वितरण करण्याचा निर्णय घेतला. गव्हाचे मोठे निर्यातदार देश असणार्‍या रशिया व युक्रेन यांच्यामधील युध्दामुळे येथून जगभराला होणारा गव्हाचा पुरवठा थांबला. परिणामी, भारतीय गव्हाला मागणी वाढली तसेच देशातून निर्यातही मोठ्या प्रमाणात झाली. या सर्वांमुळे साठवणुकीतील गव्हाचा साठा संपला. साठवणुकीतील गहू संपल्यामुळे आटा, रवा व मैदा उत्पादकांनी खुल्या बाजारातून गहू खरेदी करण्यास सुरुवात केली. बाजारात गव्हाची उपलब्धता कमी व मागणी जास्त असल्याने त्याचा परिणाम गव्हाच्या दरवाढीवर झाला आहे.

ज्वारी
राज्यातील जालना, जामखेड, अहमदनगर, कडा, बार्शी, करमाळा येथून ज्वारी बाजारात दाखल होते. लहरी हवामानामुळे बाजारात ज्वारीची उपलब्धता कमी आहे. यंदा पावसापूर्वी काही ठिकाणी पेरण्या झाल्या. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पावसानंतर खंड पडल्यानंतर पुन्हा पेरण्या झाल्या. त्यामुळे येत्या आठवडाभरात पावसापूर्वी पेरण्या झाल्या त्या ठिकाणाहून आवक सुरू होईल. खंडानंतर झालेल्या पेरण्यांची आवक फेब—ुवारीअखेरनंतर सुरू होईल. एकंदरीत, ज्वारीचे भाव नियंत्रणात येण्यासाठी मार्च उजाडणार आहे. आवक सुरू झाली तरी ज्वारीचे भाव मोठ्या प्रमाणात खाली येतील, अशी शक्यता कमी असल्याचे शेतकरी तसेच व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.

बाजरी
बाजरी ही उष्ण असल्याने ती थंडी तसेच पावसाळ्यात खाण्यास प्राधान्य देण्यात येते. यंदा राज्यात अवकाळी पावसाचा फटका बाजरीच्या पिकाला बसला. परिणामी, यंदा राज्यातील बाजरीची आवक नगण्य राहिली. तर परराज्यांतही उत्पादन घटल्याने बाजारातील आवक कमी राहिली. मात्र, ज्वारी व गव्हाचे दर उंच असल्याने नागरिकांनी थंडी असल्या मुळे बाजरी खाण्यास प्राधान्य दिले. एरवी, संक्रांतीनंतर बाजरीला मागणी कमी होऊन दरही खाली येतात. यंदा मात्र ज्वारी व गव्हाचे दर जास्त असल्याने बाजरीला सुरुवातीपासून चांगले दर मिळत आहेत.

अन्नधान्य प्रतिक्विंटल दर प्रतिकिलो दर
2022 2023 2022 2023
गहू 2400 ते 3600 3200 ते 4000 28 ते 32 रुपये 36 ते 44 रुपये
ज्वारी 2200 ते 3000 3200 ते 5000 30 ते 40 रुपये 50 ते 60 रुपये
बाजरी 2200 ते 3200 2800 ते 4000 25 ते 27 रुपये 34 ते 35 रुपये

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गूळ-भुसार बाजारात झालेली आवक क्विंटलमध्ये
अन्नधान्य राज्य जानेवारी 2023
गहू मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, राजस्थान 1 लाख 4 हजार 572.17
ज्वारी महाराष्ट्र, आंध— प्रदेश 19 हजार 672.2
बाजरी राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश 12 हजार 698.6

येत्या पंधरा दिवसांत नवीन हंगामातील गहू व ज्वारीची आवक सुरू होईल. त्यानंतर त्यांचे दर खाली येतील. सध्या केंद्र सरकारने आटा, रवा, मैदा उत्पादकांसाठी गहू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने खुल्या बाजारातून खरेदी थांबली आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात क्विंटलमागे 150 ते 200 रुपयांनी घसरण झाली आहे. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत सर्व अन्नधान्यांचे दर चढे आहेत.
                                 – विजय मुथा, माजी सचिव, दि पूना मर्चंट्स चेंबर

वाढत्या महागाईमुळे घरखर्च कसा भागवायचा, हा मोठा प्रश्न गोरगरिबांसह सर्वसामान्यांपर्यंत आहे. उत्पादनात घट झालेली असताना शासनस्तरावरही वाढत्या महागाईतून दिलासा मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे; जेणेकरून नागरिकांना वाढत्या महागाईतून थोडासा तरी दिलासा मिळेल.
                                                       – मोनिका गावडे-खलाने, गृहिणी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT