गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)  Pudhari
पुणे

GBS Strike : ’जीबीएस’चे प्रमाण तरुणांमध्ये सर्वाधिक

20 ते 29 वर्षे वयोगटांतील 42 जण

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्यात ‘जीबीएस’च्या एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक 42 रुग्ण 20 ते 29 वर्षे वयोगटांतील आहेत. त्याखालोखाल 50 ते 59 वर्षे वयोगटांतील मुलांचे प्रमाण 28 इतके आहे. म्हणजेच तरुणांमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यानंतर 40 ते 49 वर्षे वयोगटांतील 27, 10 ते 19 वर्षे वयोगटांतील 23, 30 ते 39 वर्षे वयोगटांतील 23, 60 ते 69 वर्षे वयोगटांतील 21, 70 ते 80 वर्षे वयोगटांतील सहा आणि 80-89 वर्षे वयोगटांतील चार रुग्णांचा यात समावेश आहे.

शहरात 14 जानेवारीपासून गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. ‘जीबीएस’चा प्रसार दूषित पाण्यातून झाल्याचे ‘एनआयव्ही’च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दूषित पाण्यामुळे रुग्णांमध्ये उलट्या, जुलाब, थकवा अशी लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात पाहायला मिळत आहेत. ‘जीबीएस’मध्ये शरीराच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला होतो. ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ची (जीबीएस) बाधा ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ हा जिवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे झाल्याचे उघड झाले आहे.

जिवाणू अथवा विषाणू संसर्ग झाल्यानंतर रुग्णांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती जिवाणूऐवजी शरीरातील चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यांना 1 ते 3 आठवड्यांनी गुलेन बॅरी सिंड्रोम होतो. जीबीएस हा चेतासंस्थेशी निगडित विकार आहे. त्यात शरीरातील प्रतिकारशक्तीच चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यातून हात, पाय, गळा, तोंड आणि डोळे या भागात अशक्तपणा जाणवतो. हातापायाला मुंग्या येणे अथवा ते बधिर पडणे अशी लक्षणे दिसून येतात. रुग्णांना चालण्यासह अन्न गिळण्यात आणि श्वास घेण्यात अडचणी येतात. या विकारावर लक्षणांनुसार उपचार केले जातात. त्यात आयव्हीआयजी इंडेक्शन अथवा प्लाझ्मा बदलणे असे उपचार केले जातात. या विकाराचा रुग्ण योग्य उपचारानंतर बरा होतो, अशी माहिती जनरल फिजिशियन डॉ. अनिकेत देशपांडे यांनी दिली.

आणखी नवीन पाच रुग्ण4एकूण रुग्णसंख्या 197, सात जणांचा मृत्यू

गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या पाच नव्या रुग्णांची मंगळवारी नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 197 इतकी झाली आहे. जीबीएसमधून बरे झालेल्या 104 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 192 रुग्णांपैकी 92 रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. तसेच, 40 रुग्ण पुणे मनपा, 29 रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा, 28 रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आणि आठ रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. सध्या 50 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

पुणे मनपा आणि जिल्ह्यातील बाधित भागांमध्ये सर्वेक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आत्तापर्यंत पुणे मनपामधील 46,534 घरे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 25,558 घरे, पुणे ग्रामीणमधील 13,476 घरे अशा एकूण 85 हजार 568 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT