पुणे

Pune : तीन महिन्यांपूर्वी केलेला निकृष्ट रस्ता उखडला

अमृता चौगुले

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : शिवापूर (ता. हवेली) येथील गावात अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण सुमारे तीन महिन्यांपूर्वीच पूर्ण केले होते. मात्र, ते निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने केले असल्याने हा रस्ता उखडू लागल्याने संबंधित ठेकेदारास तो पुन्हा स्वखर्चातून करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम पुन्हा सुरू केले आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्या माध्यमातून (जिल्हा नियोजन समिती मार्फत) तसेच सरपंच आण्णा दिघे, माजी सरपंच सतीश दिघे, भाजपाचे पदाधिकारी राजेंद्र दिघे, उपसरपंच राजू सट्टे, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश दिघे यांच्या पाठपुराव्याने या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला होता. सुमारे चार महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू असताना ते चुकीच्या पद्धतीने केले जात आहे असे सरपंच व इतरांनी ठेकेदारास सांगितले होते; मात्र त्याकडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे एक महिन्याच्या आतच रस्ता उखडू लागल्याने ही बाब संबंधित प्रशासनास सांगण्यात आली. परंतु याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर आमदार भीमराव तापकीर यांच्याकडे तक्रार करताच जिल्हा परिषदेचे मुख्याधिकरी यांना संपर्क करून या कामाबाबत दखल घेण्यास सांगितले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारास स्वखर्चातून पुन्हा रस्त्याचे काम करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आमदार तापकीर यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

संबंधित ठेकेदारास रस्ता उकरून पुन्हा करावयास लावला आहे. केलेले काम चुकीचेच होते, हे पाहणी दरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे त्याबाबत त्यांना पत्र देऊन समज दिली जाणार आहे.
                    – संजय गित्ते, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मी स्वतः याबाबत संबंधित प्रशासनाशी बोललो होतो; मात्र ते टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही ही बाब आमदार भीमराव तापकीर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आमदारांनी जि. प.चे मुख्याधिकारी रमेश चव्हाण यांना सांगून पुन्हा रस्ता करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. –                                                                        आण्णा दिघे, सरपंच, शिवापूर

SCROLL FOR NEXT