पुणे

चिखलीत इंद्रायणीची प्रदूषित अवस्था

अमृता चौगुले

चिखली : माणसाने पृथ्वी, आकाश, पाताळ सगळीकडे काहूर माजवले आहे आणि त्याला अपवाद नद्या तरी कशा असणार? माणसांच्या गर्दीने शहरे गजबजली असताना मोकळा श्वास घ्यायला नदीपात्राकडे जावे म्हटले तर त्याची वाट लावायचीही कसर माणसाने सोडलेली नाही. शहरीकरण वाढत असल्याने सांडपाणी आणि उद्योगांचे रासायनिक पाणी वाहून येत असल्यामुळे चिखलीमध्ये इंद्रायणी नदीची अवस्था अतिशय प्रदूषित झालेली आहे.

दशक, दोन दशक आधी अगदी निखळ आणि निर्मळ असे इंद्रायणीचे पाणी होते आणि त्या काळात गावातील हौसी पठ्ठे नदीवर आंघोळीला आणि पोहण्याचा सराव करायला जात असत. देहू आणि आळंदी या तिर्थांच्या मध्यभागी असलेल्या चिखलीगावात एकेकाळात ईश्वराच्या रूपाने पूजले जात असे. चिखली भाग ग्रामीण म्हणून ओळखला जात असताना, आजूबाजूला शेत आणि रानांच्या हिरवाईने परिसर मंत्रमुग्ध होण्याचा आनंद देत असे. काळाच्या ओघात शहरीकरण वाढल्यावर, नद्यांना आपले अस्तित्व टिकविण्याची कसरत करावी लागत आहे आणि सगळ्या शहराचा मैला, सांडपाणी, औद्योगिक मैला, कचरा, प्लास्टिक त्यात मिसळत असल्याने आता नद्या म्हणण्याऐवजी गटारे म्हणण्याची वेळ आली आहे.

कुदळवाडी, मोरेवस्ती, बोर्‍हाडेवाडी, सोनवणे वस्ती आदी भागाचे मैला आणि कचर्‍याचे अप्रत्यक्ष वहन नदीत होत आहे. या भागात औद्योगिक वसाहत बर्‍यापैकी असल्याने, केमिकलयुक्त कचरा आणि औद्योगिक सांडपाणी नदीत मिसळून नदीचे पाणी पूर्णपणे काळ्या रंगाचे दिसून येत आहे. त्यामुळे नदीची हालत अतिशय खराब आणि गढूळ पाण्याचा स्त्रोत म्हणून दिसून येत आहे. ज्याला कुणीही हात लावायलाही धजावणार नाही, अशी अवस्था आहे.

उत्तर भारतात नद्यांना देवीचे स्वरूप देऊन त्यांच्या घाटांना भव्य दिव्य, असे मोठमोठे कॉरिडॉर बनविण्याचे प्रयोग सुरू आहेत. काशी, हरिद्वार, अहमदाबाद आदी ठिकाणी नद्यांचे जतन करून त्यापासून पर्यटन आणि परिसराचा तीर्थ म्हणून विकास करण्याच्या मोठ्या परियोजना अमलात आणण्यात आल्या आहेत. राज्याला नद्यांची मोठी परंपरा आहे आणि त्याच धर्तीवर राज्यातील तिर्थांच्या आसपास असलेल्या नद्यांचे पुनर्जीवन करून तिथेही कॉरिडॉर उभारायला पुढाकार घेतला जाणे गरजेचे आहे.

नदीला जोडणारे नाले आणि मैला त्यात मिसळू नये म्हणून कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी इंटरसेप्टर बसवून ते पाणी मैला शुध्दीकरण केंद्रात वळविण्यासाठी प्रयत्न आहेत. चाकण, मोई आदी भागातूनही नदीला प्रदूषित करण्यात येत असून, त्यावरही उपाययोजना केली जाणे गरजेचे आहे.
                                     -संजय कुलकर्णी, मनपा शहर अभियंता (पर्यावरण)

विकासाच्या नावाखाली नद्यांचा कोंडमारा होत आहे. ज्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. नद्यांना मूर्त रुपात आणून, त्याचे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जतन केले जाण्याची आवश्यकता आहे आणि त्याकरिता प्रशासन आणि जनभागीदारी यांनी एकत्रित येणे जरुरीचे आहे.
                                                                     – गोरख मोरे, स्थानिक नागरिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT