पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुणे महापालिकेच्या 58 पैकी 29 प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन महिलांची आरक्षणे पडणार आहेत. त्यामुळे अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले असून, इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. महापालिकेची आरक्षण सोडत दि. 31 मे रोजी जाहीर होणार आहे. पुणे महापालिकेतील एससी प्रवर्गाच्या 23 आणि एसटी प्रवर्गाच्या 2 आरक्षित प्रभागांची यादी यापूर्वीच जाहीर केली आहे. आता या आरक्षित प्रभागातील महिला आणि इतर 33 खुल्या प्रभागांतील महिला आरक्षित जागांची सोडत निघणार आहे.
पुणे महापालिकेच्या 173 सदस्यांसाठी एकूण 58 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 57 प्रभाग तीनसदस्यीय, तर एक प्रभाग दोनसदस्यीय आहे. यामधील एससी आणि एसटी प्रवर्गाच्या 25 प्रभागांतील आरक्षण सोडत सर्वप्रथम निघेल. त्यात आधी एससी आरक्षित प्रभागात 12 महिलांची सोडत निघेल, या 12 प्रभागांत महिलांची आरक्षणे निघाल्यानंतर उर्वरित 11 जागा एससी खुल्या प्रवर्गासाठी शिल्लक राहणार आहेत. त्यानंतर एसटी प्रवर्गातील महिलेच्या एका जागेसाठी सोडत निघेल व उर्वरीत एक जागा आपोआपच एसटी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल.
एससी व एसटी आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उर्वरित खुल्या 34 प्रभागांत प्रत्येकी एक जागा पन्नास टक्के महिला आरक्षणानुसार आपोआपच आरक्षित होईल. मात्र, पन्नास टक्के म्हणजेच 173 पैकी एकूण 87 जागा महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. त्यामुळे 57 प्रभागांपैकी उर्वरित 29 प्रभागांत सोडत काढून प्रत्येकी एक जागा महिलांसाठी आरक्षित होईल. त्यानुसार 29 प्रभागांत प्रत्येकी दोन महिलांचे आरक्षण निघणार आहे.
प्रभागांमध्ये अ, ब व क अशा पद्धतीने आरक्षण निघेल. त्यात अ म्हणजेच पहिली जागा महिला आरक्षित असेल, त्यात एससी आणि एसटी या दोन्ही प्रवर्गाचा समावेश असेल. तर 'ब' ही जागा ज्या प्रभागात दोन महिला आरक्षण ती आरक्षणाची असणार आहे. मात्र, दोन सदस्यीय प्रभागातील 'ब' व तीन सदस्यीय प्रभागातील 'क' ही जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे.
एकूण सदस्य संख्या- 173
तीन सदस्यीय प्रभाग -57
दोन सदस्यीय प्रभाग -01
एससी आरक्षित जागा -23
एसटी आरक्षित जागा- 02
महिला आरक्षित जागा -87