road safety cctv File Photo
पुणे

Traffic Rules | वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर 'एआयचा' डोळा !

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस आता इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) या प्रणालीचा वापर करणार आहेत. आर्टिफिशल इंटेलिजन्स सिस्टीमवर (एआय) आधारित ही यंत्रणा असणार आहे.

चौकामध्ये एखाद्या वाहनाने नियमांचे उल्लंघन केले तर अवघ्या पाच मिनिटात दंडाची पावती त्या वाहनचालकाच्या मोबाईलवर फोटोसह जाऊन पडणार आहे. त्यासाठी पोलिस अॅटोमॅटिक नंबर प्लेट रिक्गनेशन कॅमेऱ्याची (एएनपीआर अर्थात, स्वयंचलित नंबरप्लेट ओळखणारा कॅमेरा) मदत घेणार आहेत. याबाबत पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षणास सुरुवात केली आहे, यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून, कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

सद्यः परिस्थितीला शहरात स्मार्ट सिटीचे ४३० आणि क्राईमच्या संदर्भातील १३४१ कॅमेरे आहेत. देशात सर्वाधिक वाहनांची संख्या असणाऱ्या शहरात पुण्याचा क्रमांक लागतो. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणा-यांची संख्यादेखील मोठी आहे. वाहतूक विभागाकडील अपुरे मनुष्यबळ, वाहतूक नियमन यासह विविध कामांमुळे पोलिसांना अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना मर्यादा निर्माण होतात.

तर दुसरीकडे नियंत्रण कक्षातून कॅमेऱ्याद्वारे कारवाई करताना एकाचवेळी अनेक ठिकाणी लक्ष ठेवता येत नाही. त्यामुळे पोलिस सिप्रलवरील कॅमे-यांचा प्रभावी वापर करून ही स्मार्ट यंत्रणा लागू करण्याच्या विचाराधीन आहेत.

सध्या नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर चौकात थांबून पोलिस प्रत्यक्ष कारवाई करतात. तर वाहतूक विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई केली जाते, कॅमेऱ्याद्वारे कारवाई करताना, नियंत्रण कक्षात बसलेले पोलिस कॅमेऱ्यावरून चौक निवडतात. चौकात सिग्नल तोडणारे, ट्रिपलसिट येणारे दुचाकीचालक, झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेली वाहने यांच्या फोटोचे स्क्रिन शॉर्ट घेतात. त्यामध्ये संबंधित वाहनांचा नंबर असतो.

पुढे ही माहिती त्या- त्या वाहतूक विभागाला वाहनांच्या फोटोसह दिली जाते. त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरून मोबाईल क्रमांकाच्या आधारे नियम तोडणाऱ्या वाहनचालकाची माहिती घेऊन दंडाची पावती मोबाईलवर फोटोसह पाठवून दिली जाते. मात्र, आता या प्रणालीच्या माध्यमातून नियमभंग होताच काही मिनिटात दंडाची पावती वाहनचालकाच्या मोबाईलवर धडकणार आहे.

नियम मोडणाऱ्या वाहनांवर आयटीएमएसच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. वाहनचालकांनी नियम तोडल्यास पुढील चौकात जाईपर्यंत नियम तोडल्याचा मेसेज आणि दंडाची रक्कम मोबाइक क्रमांकावर येणार आहे. त्यामुळे वेळ आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या श्रमाचीदेखील बचत होण्यास मदत होणार आहे.

अशी करणार प्रणाली काम

इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) प्रणालीच्या माध्यमातून चौकात, रस्त्यांवर लावण्यात आलेले कॅमेरे प्रादेशिक परिवहनच्या विभागाच्या सारथी आणि वाहन या संकेतस्थळाला जोडलेले असणार आहेत. हे सर्व कॅमेरे हायटेक असणार आहेत. वाहनचालकांनी नियम मोडल्यास हे कॅमेरे स्वतः वाहनचालकाचा फोटो काढतील. कॅमेरा सारणी आणि वाहनाला कनेक्ट असल्याने नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना मेसेज करून दंडाची रक्कम मोबाईल क्रमांकावर पाठवणार आहे. यात ओव्हर स्पीड, सिग्रल न पाळणे यांसारखे नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार आहे. हे कॅमेरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस कॅमेरे असणार आहे. या कॅमेऱ्यामध्ये प्रोग्रामिंग सेट करण्यात येणार असून, ते याच धर्तीवर हे कामकाज चालणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT