पुणे

पिंपरी : साहेब… तळवडेत लहान मुलाचा मृतदेह पडलाय ! ‘त्या’ कॉलमुळे पोलिसांची धावपळ

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वेळ दुपारची, जेवण करून सर्व पोलिस आपल्या कामाला लागणार, तोच नियंत्रण कक्षाचा फोन खणाणला. साहेब..! तळवडे येथे एका लहान मुलाचा मृतदेह पडलाय, आम्हाला मदतीची गरज आहे, असे सांगून कॉलरने फोन बंद केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात देत अवघ्या काही मिनिटांतच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. परिसर पिंजून काढल्यानंतरही असा कोणताही प्रकार आढळून न आल्याने पोलिसांनी शेवटी कॉलरलाच शोधून काढले. त्यानंतर मात्र
पोलिसांनी डोक्यालाच हात लावला, कारण कॉलर मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काही महिन्यांपूर्वी चिखलीतील हरगुडे वस्ती येथे एका व्यापाराच्या आठ वर्षीय मुलाचा मृतदेह निर्जन ठिकाणी मिळून आला होता. दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर सर्व व्यापार्‍यांनी बंद पुकारला. तसेच, आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा व्यापारी संघटनांनी घेतला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशीच काहीशी परिस्थिती त्या वेळी तयार झाली होती. शेवटी पोलिसांनी नातेवाइकांची कशीबशी समजूत घालून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.

दरम्यान, मंगळवारी दुपारी चिखली पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की, तळवडे येथे एका लहान मुलाचा मृतदेह आढळला आहे. चिखली पोलिसांनी घटनेचा गांभीर्य लक्षात घेत अवघ्या काही मिनिटांतच तळवडे गाठले. मात्र, नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या ठिकाणावर असा कोणताही प्रकार पोलिसांना आढळून आला नाही. तरीदेखील शंकेला वाव नको म्हणून पोलिसांनी परिसर पिंजून काढला. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेची पथकेदेखील घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांनी देखील आजूबाजूला विचारपूस करून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याही हाती काहीच लागले नाही.

शेवटी पोलिसांनी नियंत्रण कक्षाला माहिती देणार्‍या कॉलरला माहिती विचारण्यासाठी फोन केला. मात्र, कॉलर नीट माहिती देत नव्हता, तसेच दिलेल्या माहितीमध्ये विसंगती असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी शेवटी कॉलरचाच पत्ता शोधून काढला. कॉलरला शोधून काढल्यानंतर पोलिसांना हा फेक कॉल असल्याचे लक्षात आले.

मानसिक रुग्ण…

कॉलर हा मानसिक रुग्ण असून त्यावर उपचार सुरू असल्याचेही पोलिसांना समजले. असा कोणताही प्रकार नसल्याचे चिखली पोलिसांनी वायरलेसद्वारे कळवल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. मात्र, या कॉलमुळे पोलिस यंत्रणा चांगलीच कामाला लागल्याचे पहावयास मिळाले.

नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळालेल्या कॉलची पूर्तता करण्यासाठी आम्ही घटनास्थळावर दाखल झालो. मात्र, असा कोणताही प्रकार घडला नव्हता. तसेच, कॉल करणारा इसम मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे.
                                  – वसंत बाबर, वरिष्ठ निरीक्षक, चिखली पोलिस ठाणे.

SCROLL FOR NEXT