पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात 29 नोव्हेंबर रोजी जॅपनीज इनसिफेलायटिसचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर 14 डिसेंबरपर्यंत एकूण 57 डुकरांचे रक्तनमुने घेण्यात आले आहेत. यापैकी एकाही नमुन्यामध्ये जे.ई. आरएनए सापडलेला नाही. शहर आणि नगररोड वडगाव शेरी परिसरातील ताप रुग्ण सर्वेक्षण अधिक गतिमान करण्यात आले आहे.
वडगाव शेरी येथे 4 वर्षे वयाच्या मुलांमध्ये जेईचे निदान झाल्यावर तातडीने सर्वेक्षण, उपचारात्मक आणि साथ उद्रेक प्रतिबंधात्मक खालील उपाययोजना करण्यात आल्या. रुग्णाच्या घरातील 7 सहवासितांचे आणि घराजवळील 16 लोकांचे रक्तजल नमुने संकलित केले व ते एन. आय. व्ही. पुणे येथील जे.ई. डिव्हिजन यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले.
रुग्ण राहात असलेल्या भागात प्रत्येक घरोघरी जाऊन 480 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. किटक शास्त्रीय सर्वेक्षण करून क्युलेक्स संवर्गातील डासांचे 14 नमुने तपासणीसाठी एन. आय. व्ही.कडे पाठविण्यात आले. रुग्णाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लहान मुलांमध्ये जलद ताप सर्वेक्षण करण्यात आले. त्यात संशयित रुग्ण आढळला नाही. पुढेही 15 दिवस ताप सर्वेक्षण करून त्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी एन. आय. व्ही. पुणे येथे येणार आहेत.
रुग्ण ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत असून रुग्णाची स्थिती सध्या स्थिर आहे. रुग्णाच्या आजूबाजूच्या परिसरातील डासोत्पत्ती स्थानांचा शोध घेऊन त्यांचा नायनाट करण्यासाठी अबेटिंग, जमा झालेले पाणी काढून टाकणे, डासनाशक फवारणी करण्यात आली आहे. तसेच अजून डासांचे नमुने घेतल्यानंतर घरामध्ये व घराबाहेर फवारणी करण्यात आली आहे.
रुग्णाच्या निवास परिसरातील 8 श्वान आणि 12 डुकरे यांचे रक्त 1 डिसेंबर रोजी संकलित करून तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आली. एन. आय. व्ही. च्या तज्ज्ञ टीमने भेट देऊन नमुने संकलित करण्यात सहकार्य आणि मार्गदर्शन केले. डॉ. सारणीकर सर -ऊकज मलेरिया आणि टीमने भेट देऊन मार्गदर्शन केले. रुग्णाच्या निवास परिसरातील पाळीव प्राण्यांचे रक्त संकलित करून तपासणीसाठी एन. आय. व्ही. येथे पाठविण्यात येणार आहेत.
'जेई' हा विषाणूजन्य आजार आहे. तो क्युलेक्स विष्णोई या जातीच्या डासांपासून पसरतो. या रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः लहान मुलांमध्ये आढळतो. हा विषाणू असलेल्या प्राण्याला या डासाची मादी चावल्यास ती दूषित होते. असा डास माणसाला चावल्यास या रोगाचा संसर्ग होतो.