पुणे

पुणे : कांबरे येथील पांडवकालीन मंदिर आले पाण्याबाहेर

अमृता चौगुले

भोर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  भाटघर धरणातून सातत्याने होणा-या विसर्गामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. धरणात फक्त 6 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे कांबरे (ता. भोर) येथे भाटघर धरणात गेलेले कांबरेश्वराचे मंदिर बाहेर आले आहे. हे प्राचीन मंदिर पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिक येथे येत आहेत. भोरपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर कांबरे गावातील धरणपात्रात कांबरेश्वराचे मंदिर आहे.

हे मंदिर 10 महिने पाण्यात असते. धरणातील पाणी कमी झाल्याने मंदिर पाण्याबाहेर आले आहे. वेळवंड नदीमध्ये प्राचीन पांडवकालीन शिवमंदिर आहे. मंदिराचे मूळ नाव कर्मगरेश्वर आहे; परंतु ते कांबरे गावाच्या हद्दीत असल्याने त्याला कांबरेश्वर नावाने ओळखले जाते. हे मंदिर पांडवांनी बांधल्याची आख्यायिका आहे. वर्षातील दहा महिने हे मंदिर पाण्यात असते. धरणातील पाणी कमी झाल्यावर जून महिन्यात ते पाण्याबाहेर येते. पूर्वी मंदिरात जाताना वर चढून जावे लागत होते. मात्र, आता गाळामुळे मंदिराच्या पाय-या गाडल्या गेल्या आहेत. मंदिरासमोर नंदी असलेला चौथरा आहे.

मंदिराच्या कळसाचे व वरील बाजूचे बांधकाम चुनखडक वाळू आणि भाजलेल्या विटात आहे. मंदिराच्या भिंतींचे बांधकाम दगडात केलेले आहे. मात्र, दगड साधेसुधे नसून 20 मजुरांनाही एकत्र येऊन उचलता येणार नाहीत, इतके मोठे आहेत. पांडवांनी त्या काळात कुशल कलाकृतीचा वापर करून आयातकृती दगड एकावर एक बसवून मंदिराची रचना केली होती. धरणात पाण्याबरोबर वाहात येणा-या गाळामुळे मंदिर जमिनीखाली गेले आहे.

मात्र मंदिराचा पाया आणि त्यावरील बांधकाम असूनही भक्कम आहे. धरणातील पाण्याच्या लाटांमुळे थोडीफार मोडतोड झाली आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग असून, पार्वती मातेची मूर्ती व नंदीही आहे. दरवर्षी जून महिन्यात भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यावर कांबरेश्वर मंदिर पाण्याबाहेर आल्यावर कांबरे गावातील व भुतोडे भागातील नागरिक मंदिर पाहण्यासाठी आणि कांबरेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात आणि मंदिराजवळ बसून पूर्वजांच्या आठवणीला उजाळा देत असतात.

SCROLL FOR NEXT