पुणे

Ashadhi Wari 2023 : फुलांच्या पायघड्यांनी तुकोबारायांच्या पालखीचे लोणी काळभोरला स्वागत

अमृता चौगुले

 सीताराम लांडगे :

लोणी काळभोर :

पावलों पंढरी वैकुंठभुवना ।
धन्य अजिदिन सोनियाचा ॥1॥
पावलों पंढरी आनंद गजरे ।
वाजतील तुरे शैख भेरी ॥2॥
पावलों पंढरी क्षेत्रअलिंगनी।
संत या सज्जनी निवविलों ॥3॥
पावलों पंढरी पार नाहीं सुखा ।
भेटला हा सुखा मायबाप ॥4॥
पावलों पंढरी येरझार खुंटली ।
माउली वोळली प्रेमपान्हा ॥5॥
पावलों पंढरी आपले माहेर ।
नाही संवसार तुका म्हणे ॥6॥

अशी आर्त विनवणी विश्वाच्या नायकास अर्थात पंढरीच्या पांडुरंगास करीत पंढरीच्या वाटेने निघालेला वैष्णवांचा मेळा केवळ विठ्ठलाचा नामघोष करीत पुण्यनगरीचा दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन पुणे-सोलापूर महामार्गाने निघाला. संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस दाखल होऊनही तो सक्रिय होत नसल्याने दुष्काळाचे सावट निर्माण होत आहे. लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात सायंकाळी सात वाजता सोहळा मुक्कामी पोहचला. या वेळी लोणी काळभोर ग्रामस्थांनी या सोहळ्याचे भव्य स्वागत केले.

कवडीपाट येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी भूषण जोशी व अधिकार्‍यांनी स्वागत केले. प्रांताधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे, निवासी नायब तहसीलदार स्वाती नरुटे यांनी दिंड्यांच्या सहकार्यासाठी विशेष लक्ष ठेवले होते. सायंकाळी सातच्या सुमारास पालखी सोहळ्याने लोणी काळभोरमध्ये प्रवेश केला. या वेळी आमदार अशोक पवार यांनी राज्य शासनाच्या वतीने स्वागत केले, तर गावच्या वतीने लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, उपसरपंच ललिता राजाराम काळभोर, ग्रामविकास अधिकारी एस. एन. गवारी व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या वतीने स्वागत केले.

दत्त मंदिराजवळ हवेलीचे ज्येष्ठ नेते माधव काळभोर, माजी जि. प. सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, काँग्रेसचे शिवदास काळभोर, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, साधना बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, माजी सरपंच शरद काळभोर, पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महिला जिल्हा संघटक श्रद्धा कदम, शहर प्रमुख संतोष भोसले, तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्हा संघटक नीलेश काळभोर यांनी स्वागत केले. पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे ढोल-लेझीम पथक होते, कन्याप्रशाळेच्या विद्यार्थिनींची वृक्षदिंडी होती.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT