पुणे

बारामती : अधिकार्‍यालाच माहीत नाही, अनामत रक्कम किती?

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : वाघळवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांकडून अनामत रक्कम म्हणून प्रत्येकी 5 हजार रुपये निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 13 उमेदवारांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केले होते. वास्तविक खुल्या गटाला सरपंच व सदस्यपदासाठी 500 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये अनामत रक्कम म्हणून घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. मात्र, वाघळवाडी ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकार्‍याने उमेदवारांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये घेतले. दै. 'पुढारी'त अनामत रकमेबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही इच्छुकांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना यासंबंधी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी लागलीच मवाळ भूमिका घेत प्रकरण मिटवून घ्या, अशी भाषा सुरू केली.

मंगळवारी (दि. 6) थेट वाघळवाडी गावात जात अनामत रक्कम म्हणून घेतलेल्या 5 हजार रुपयांपैकी 4500 रुपये संबंधितांना परत करण्यात आले. परंतु यापूर्वी पाच हजार रुपयांच्या दिलेल्या पावत्या उमेदवारी अर्ज दाखल करणारांकडे कायम आहेत. उमेदवारांनीही निवडणूक काळात या अधिकार्‍याकडून उपद्रव नको, असे म्हणत प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार केलेली नाही.
500 रुपये अनामत रक्कम असताना 5 हजार रुपये का स्वीकारले हा प्रश्न मात्र यामुळे उपस्थित झाला असून वरिष्ठ अधिकारी नेहमीप्रमाणेच अशा अधिकार्‍यांना पाठीशी घालणार का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या सुरू असून बुधवारी चिन्हवाटप होऊन 18 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍यांना अनामत रक्कमेबाबत माहिती नसणे ही गंभीर बाब असून अशा अधिकार्‍यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. वास्तविक एखाद-दुसर्‍या उमेदवारांकडून जास्तीचे पैसे घेतल्यानंतर चूक लक्षात येणे गरजेचे होते. मात्र, सरसकट पाच हजार रुपये घेण्यात आले. बोभाटा झाल्यावर पुन्हा ही रक्कम परत करण्यात आल्याचा प्रकार  घडला आहे.

SCROLL FOR NEXT