हिरा सरवदे :
पुणे : पुढारी वृत्तसेवा : सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब म्हणून ओळखल्या जाणार्या पुणे शहरात पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. स्मार्ट सिटी म्हणून मिरवणार्या शहराचे प्रशासन यासाठी काही ठोस काम करणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय नियमानुसार 50 लोकांमागे 1 सार्वजनिक स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. तसेच शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंस आणि बाजारपेठांच्या परिसरात दर 2.5 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर सार्वजनिक स्वच्छतागृह हवे. मात्र, पुण्यात एकूण 1,381 सार्वजनिक स्वच्छतागृह असून, त्यात झोपडपट्ट्यांमध्ये 861, सार्वजनिक ठिकाणी 363 स्वच्छतागृह आणि 157 मुतार्यांचा समावेश आहे. ही संख्या शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य असून, त्यात महिलांसाठी बांधलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अत्यल्प आहे.
परिणामी, विविध कामांनिमित्त घराबाहेर पडणार्या आणि खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये येणार्या महिला-तरुणींसाठी स्वच्छतागृहांचा शोध घेताना तारेवरची कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर दै. 'पुढारी'ने शहरातील काही स्वच्छतागृहांची पाहणी केली. काही महिला व तरुणींशी संवाद साधल्यानंतर विदारक चित्र समोर आले आहे. मुळात स्त्रियांसाठी बांधलेली स्वच्छतागृहे महिला व मुलींना सापडत नाहीत. सापडलीच तर त्यामध्ये अस्वच्छता, दुर्गंधी आणि पाण्याचा अभाव असतो. पाणी असलेच तर नादुरुस्त नळ आणि पाईपलाईनमुळे सर्वत्र पाणी साचलेले असते. या कारणांमुळे महिला व मुली सार्वजनिक स्वच्छतागृह न वापरता, मॉल, हॉटेलमधील टॉयलेट वापरण्यास प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे.
महिलांकडून उकळले जातात पैसे…
महिलांसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहात घाणीचे व दुर्गंधीचे साम—ाज्य असते. तर सुलभ शौचालयामध्ये पैसे उकळले जातात. सुलभ शौचालयामध्ये लघुशंकेसाठी पुरुषांकडून पैसे घेतले जात नाहीत. मात्र, महिलांकडून कधी पाच तर कधी दहा रुपये घेतले जातात.
तुळशीबाग, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आदी ठिकाणी महिला स्वच्छतागृहे आहेत. मात्र, इतर रस्त्यांवर त्याची संख्या कमी आहे. रस्ते, बाजारपेठा व पीएमपीच्या मुख्य बसथांब्यांच्या ठिकाणी महिला स्वच्छतागृहे असावीत. जिथे आहेत त्यांची अवस्था खूप वाईट असते. महिलांना युरिन इन्फेक्शनचे आजार होऊ नयेत यासाठी महापालिकेने साफसफाईकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
– माधुरी इनामदार, गृहिणी
नैसर्गिक प्रक्रिया रोखून ठेवल्यास किंवा ती वेळेत न केल्याने महिला व मुलींना युरिन इन्फेक्शन, मूत्राशयाला सूज येणे, त्यामध्ये खडे होणे, मुत्राशय अरुंद होणे, मूत्रमार्गात जंतूसंसर्ग होणे, किडनीचे विकार होणे अशा व्याधी जडतात. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या कमतरतेमुळे बाहेर जाताना मुली व महिला पाणी कमी पितात. यामुळे अस्वस्थता, नैराश्य येणे, आत्मविश्वास कमी होणे, असे प्रकार घडू शकतात.
– डॉ. सिद्धार्थ शिंदे, शिंदे हॉस्पिटल, नाना पेठ.