एमटीडीसी Pudhari
पुणे

राज्यात महिला संचालित पर्यटनस्थळांची संख्या वाढणार

पुढारी वृत्तसेवा

शिवाजी शिंदे

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर, खारघर आणि नागपूर येथील महिला संचलित पर्यटन केंद्रांना पर्यटकांकडून त्यातही एकट्याने प्रवास करणार्‍या महिला पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यात आणखी अशी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. राज्य शासन त्यासाठी विविध पर्यटनस्थळांचा अभ्यास करीत आहे.

राज्यातील अन्य पर्यटनस्थळांपेक्षा महिला संचालित स्थळांना पर्यटकांकडून तीस टक्के अधिक प्रतिसाद लाभला आहे. या केंद्रावरील निवासव्यवस्थेबरोबरच उपाहारगृह अन्य सेवा पर्यटकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या आहेत.

पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा, त्यांचा आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांच्यातील उद्योजकता वाढीस लागावी, यासाठी राज्य शासनाने गेल्या वर्षापासून महिला केंद्रित पर्यटन धोरण लागू केले. त्या अनुषंगाने महामंडळाच्या (एमटीडीसी) छत्रपती संभाजीनगर व अर्का उपाहारगृह, खारघर तसेच नागपूर येथील पर्यटनस्थळावर निवास, उपाहारगृहाचे व्यवस्थापन महिलांकरिता आहेत. महामंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून या योजना यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहेत.

पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. त्यानुसार महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभुत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचबरोबर महिला पर्यटकांसाठी विविध कस्टमाईज्ड उत्पादने, सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास अशी धोरणाची पंचसुत्री आखण्यात आली आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणे, उपाययोजना सुचविणे व संनियंत्रण करण्यासाठी पर्यटनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदलाची रचना करण्यात आलेली आहे.

पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना (होम स्टे, हॉटेल /रेस्टारंट, टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल एजन्सी आदी.) पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विविध प्रोत्साहने आणि सवलती देण्यात येणार आहेत. नोंदणीकृत पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या महिला सहल मार्गदर्शक, महिला वाहनचालक, महिला सहल संचालक (टुर ऑपरेटर) व इतर महिला कर्मचारी यांना केद्र राज्य शासनाच्या विमा योजनेमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे

महिला पर्यटकांना विविध सवलती

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या टुर ऑपरेटरमार्फत आयोजित पर्यटन सर्किट, पॅकेजस मध्ये महिला पर्यटकांना विविध सवलती देण्यात येत आहेत.तसेच एमटीडीच्या निवासांच्या ठिकाणी, महिला बचत गटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादीच्या विक्रीसाठी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचबरोबरच एमटीडीच्या रिसॉर्ट्समध्ये महिला पर्यटकांसाठी विशेष सुविधा देण्यात येत आहेत

महिलांना प्रवासात आणि पर्यटन करताना येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी पर्यटक निवासामध्ये महिलांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असल्याने आणि पर्यटनास नव्याने चालना मिळत आहे. महामंडळाकडून रणरागिणींचा सन्मान केला जात आहे.
दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महामंडळ, छत्रपती संभाजीनगर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT