पुणे

ऑनलाइन वीजबिल भरणार्‍यांचा आकडा महिनाभरात कोटींच्यावर

अमृता चौगुले

शिवाजी शिंदे

पुणे : वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आलेली ऑनलाइन पेमेंट सुविधा नागरिकांच्या पसंतीला चांगली उतरताना दिसत आहे. कारण, महिनाभरात (नोव्हेंबर ते डिसेंबर) तब्बल 1 कोटी 11 लाख 53 हजार 703 लघुदाब ग्राहकांनी आपला वीजबिल भरणा ऑनलाइनरीत्या केला आहे. यातून महावितरणला एकूण 2 हजार 230 कोटी ग्राहकांकडून वीजबिलाच्या भरणापोटी एकूण 2 हजार 230 कोटी सहा लाख इतकी रक्कम आली आहे.

कोकण विभाग आघाडीवर

ऑनलाइन वीजबिल भरणा करण्यात कोकण प्रादेशिक विभागाचे ग्राहक आघाडीवर असून, एकूण 49 लाख 21 हजार 693 ग्राहकांनी 1001 कोटी 12 लाख रुपयांचा भरणा केला आहे. तर याखालोखाल पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या 33 लाख 75 हजार 471 ग्राहकांनी 751 कोटी 85 लाख इतका, तर नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या 19 लाख 33 हजार 256 ग्राहकांनी 299 कोटी 15 लाख इतका भरणा केला आहे. याचबरोबर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या 9 लाख 23 हजार 283 इतक्या ग्राहकांनी 177 कोटी 96 लाख इतका ऑनलाइन भरणा केला आहे.

वीजबिलचा तपशील एका क्लिकवर
वीज ग्राहक संगणक किंवा मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने वीजबिल भरू शकतात. यामुळे ग्राहकांचा वेळ वाचू शकतो.
ग्राहक महावितरणच्या मोबाईल अ‍ॅप किंवा संकेतस्थळावर चालू किंवा थकबाकीचे वीजबिल पाहू शकतात. तसेच त्याचा भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंग अशा कोणत्याही ऑनलाइन पर्यायाद्वारे करू शकतात. ऑनलाइन वीजबिल भरल्यास संगणकीकृत पावतीही ग्राहकाला मिळते. महावितरणचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत असून, ही सेवा 24 तास उपलब्ध आहे.

SCROLL FOR NEXT