पुणे

पुणे : दामिनी पथके, बीट मार्शलची संख्या वाढणार

अमृता चौगुले

पुणे : प्रेमसंबंध संपविल्याच्या कारणातून तरुणीवर भर रस्त्यावर पाठलाग करीत एकाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर पोलिस दल खडबडून जागे झाले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची गस्त वाढविण्यात येणार असून, सध्या कार्यरत 15 दामिनी पथकांमध्ये 25 पथकांची वाढ करण्यात आली आहे. एका दुचाकीवर दोन महिला कर्मचारी गस्त घालणार आहेत. यामुळे आता दामिनी पथकांची संख्या 40 झाली असून, शाळा, महाविद्यालये, महत्त्वाचे चौक, गर्दीच्या परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे. तसेच, सकाळ आणि सायंकाळी अशा दोन सत्रांत शंभर बीट मार्शल तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली. तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर दुसर्‍या दिवशी राज्यभरातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रया उमटल्या.

तरुणांनी हल्लेखोराला पकडून पेरूगेट पोलीस चौकीत आणल्यानंतर तेथे पोलीस उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे दोन कर्मचार्‍यांना तेथे ड्युटी देण्यात आली असतानादेखील ते चौकीत नव्हते. तसेच, घटनास्थळी पोलिसांना पोहोचण्यास उशीर झाल्याने पोलिसांचे पेट्रोलिंग, बीट मार्शल, तसेच दामिनी पथकांवर टीका झाली. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, शहरात पोलीस गस्त वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरातील शाळा, महाविद्यालये, क्लासेस, अभ्यासिका, तसेच गर्दीच्या ठिकाणी हे दामिनी पथके आणि बीट मार्शल गस्त घालणार आहेत. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी पीक अव्हर्स म्हणजेच गर्दीच्या वेळी गस्त वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. काल विद्यार्थिनीवर हल्ला केलेल्या हल्लेखोराने शाळेच्या बॅगेत कोयता टाकून आणला होता. त्यामुळे पोलिसांकडून नाकाबंदीदरम्यान अशाप्रकारच्या बॅगा, संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी गस्त वाढविण्यावर भर दिल्याचे दिसत आहे.

शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार असून, यासाठी दामिनी पथक, बीट मार्शल वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शाळा, महाविद्यालये येथे तक्रारींसाठी ड्रॉपबॉक्स बसविण्यात येणार आहेत. वेळोवेळी स्थानिक पोलिसांकडून याची तपासणी होईल.
                                             – रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर. 

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT