पुणे

बारामती : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबेना ! न्यायालय इमारत कुत्र्यांचे माहेरघर

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील मुख्य रस्ते, चौक, सरकारी कार्यालये, दुकाने, रुग्णालये या ठिकाणी फिरणार्‍या भटक्या कुर्त्यांची संख्या वाढली आहे. भटक्या कुर्त्यांनी आता आपला मोर्चा थेट बारामतीच्या न्यायालयात वळवला असून, न्यायालय इमारत व परिसर भटक्या कुत्र्यांचे माहेरघर बनले आहे. विकसीत बारामतीला हे न शोभणारे असूनही यावर कोणतीही उपाययोजना होत नाही.

अपघातांना कारणीभूत ठरणार्‍या या भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा करूनही प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. शहरातील वर्दळीची ठिकाणे आणि मुख्य चौकात ही कुत्री रस्त्याच्या मधोमध उभी अथवा बसलेली असतात तर वारंवार रस्त्यावरून ये-जा करतात. यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना चांगलीच कसरत करावी लागते. टोळीने फिरणारी जनावरे आणि त्यात आता कुर्त्यांची भर पडली आहे. भटकी कुत्री अनेकदा नागरिकांवर हल्लेदेखील करतात.

अशा घटना यापूर्वी शहरात घडल्या असल्याने त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भटकी कुत्री, जनावरे, डुकरे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. मंडई परिसरात असलेल्या कचराकुंड्यांवर, हॉटेल बाहेरील कचराकुंड्यांवर तसेच हॉटेलमधील शिळ्या पदार्थांवर या कुर्त्यांची गुजराण होत असल्याने याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

शहरातील मुख्य असलेला भिगवण चौक, तीनहत्ती चौक, सुभाष चौक, गांधी चौक, सिनेमा रोड, भाजीमंडई, गुणवडी चौक, इंदापूर रस्ता, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्ता, पाटस रोड, शहरातील सर्वच मुख्ये रस्ते, शाळा महाविद्यालय परिसर, बस स्थानक आदी भागांत या कुत्र्यांचे वास्तव्य आहे.

एकीकडे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला असतानाच या मोकाट जनावरे व भटक्या कुर्त्यांमुळे बारामतीकर हैराण झाले आहेत. पालिका प्रशासनाने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा भटक्या कुत्र्यांच्या व जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी बारामतीकर करत आहेत.

न्यायालय परिसर भटक्या कुत्र्यांचे आश्रयस्थान
इतरत्र ठिकाणी भटकणारी कुत्री न्यायालय परिसरात फिरत आहेत. थेट न्यायालयाच्या पायरीवरच भटकी कुत्री झोपलेली दिसतात. न्यायालय इमारत व परिसर भटक्या कुत्र्यांचे माहेरघर बनले आहे. एखाद्याला चावा घेतल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT