पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने शहरातील महत्त्वाचा रस्ता असलेल्या बाजीराव रस्त्याचे डांबरीकरण करून तो चकाचक केला आहे. मात्र, या रस्त्यावरील चेंबर मात्र 'जैसे थे'च ठेवल्याने जागोजागी चेंबरचे खड्डे निर्माण झाले आहेत. या विषम पातळीवरील चेंबरमध्ये चारचाकी व दुचाकी वाहने आदळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
समान पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्याचे काम, ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम यांसह इतर सेवा वाहिन्याच्या कामांसाठी झालेली खोदाई आणि पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली होती. जी- 20 परिषदेसाठी शहरात परदेशी पाहुणे येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील अनेक रस्ते आणि चौकांचे सुशोभीकरण करून रस्ते चकाचक केले. परिषद झाल्यानंतरही महापालिकेने रस्ते चकाचक करण्याचे काम सुरूच ठेवले.
या अंतर्गत महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील महत्त्वाचा रस्ता अशी ओळख असलेल्या बाजीराव रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वी केले आहे. हे काम अद्यापही सुरूच आहे. मात्र, या भागात डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे, अशा भागातील रस्त्यावरील चेंबर अनेक दिवसांपासून 'जैसे थे'च आहे. चकाचक रस्त्यावर जागोजागी चेंबरचे खड्डे आहेत. रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे दोन वाहनांमध्ये जास्त अंतर राहात नाही. अशावेळी अनेक वाहने चेंबरच्या खड्ड्यात आदळतात. यामुळे वाहनचालकांच्या मणक्याला दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे चेंबर समपातळीवर करून घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बाजीराव रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम सुरू आहे. ते अद्याप पूर्ण झालेले नाही. ज्या भागात रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे तेथील चेंबर दोन दिवसांत समपातळीवर आणण्याचे काम करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत.
– व्ही. जी. कुलकर्णी, विभागप्रमुख, पथविभाग, महापालिका.