पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय पक्षांचे बॅनर, फलक, होर्डिंग, बोर्ड तत्काळ काढून टाकावेत, असे निर्देश महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सहायक आयुक्त राजेश आगळे यांनी सोमवारी (दि. 30) दिले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर 13 दिवसांनंतर महापालिका प्रशासनाला जाग आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता 18 जानेवारीपासून लागू झाली आहे.
आचारसंहिता लागू असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात विनापरवाना राजकीय बॅनर, फलक, होर्डिंग, बोर्ड व जाहिराती असलेले फलक काढून टाकण्यासंबंधी 23 जानेवारीला जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आचारसंहिता समन्वय अधिकारी अस्मिता मोरे यांनी पालिकेला आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
दरम्यान, सोमवारी (दि.30) सहायक आयुक्त राजेश आगळे यांनी संबंधित कर्मचाार्यांची बैठक घेऊन तसे निर्देश दिले. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहे. त्यानुसार सर्व बीट निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षकांना नेमलेल्या भागात वारंवार पाहणी करावी. विनापरवाना राजकीय बॅनर, फलक, होर्डिंग, बोर्ड, जाहिराती असलेले फलक काढून टाकावेत. तसेच, दैनंदिन कारवाईचा अहवाल अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठवावा, असे आगळे यांनी कर्मचार्यांना सूचना दिल्या आहेत.