जन्मदात्रीने जुळ्यांना पाण्याच्या टाकीत बुडवले  file photo
पुणे

दुर्दैवी ! मुलांची वाढ नीट होत नाही म्हणून जन्मदात्रीने जुळ्यांना पाण्याच्या टाकीत बुडवले

दोघांचाही बुडून मृत्यू ; स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पुणे : टेस्ट ट्युब बेबीकरिता मोठ्या प्रमाणावर खर्च करून दोन जुळी मुले झाली. मात्र, त्यांची वाढ योग्यरीत्या होत नसल्याच्या तणावापोटी आईने दोन महिन्यांच्या जुळ्या मुलांना छतावरील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत बुडवून जिवे मारले. त्यानंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना थेऊरमधील दत्तनगर भागातील काकडे वस्तीत मंगळवारी (दि.8) सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी या महिलेच्या भावाने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी 35 वर्षांच्या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे राहणार्‍या एका व्यक्तीसोबत विवाह झाला आहे. तिचे पती बँकेत नोकरी करतात. विवाहाच्या 10 वर्षांनंतरही त्यांना मुल होत नसल्याने त्यांनी मोठा खर्च करून टेस्ट ट्युब बेबीचा पर्याय निवडला. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून त्या माहेरी दत्तनगर थेऊर येथे आल्या होत्या. टेस्ट ट्युब बेबीच्या माध्यमातून त्यांना दोन महिन्यांपूर्वी दोन जुळे मुले झाली. परंतु, त्यांची वाढ योग्यरीत्या होत नव्हती. या बाळंतपणात महिलाही खूप अशक्त झाली असून, त्यांना काही आजार झाला आहे.

मुलांची योग्य वाढ होत नसल्याने व त्याचा खर्च परवडत नसल्याने त्या तणावात होत्या. त्यातूनच त्या मंगळवारी सकाळी दोन्ही बाळांना घेऊन घराच्या छतावर गेल्या. त्यांनी छतावरील प्लास्टिकच्या टाकीमधील पाण्यात दोन्ही बाळांना बुडविले व स्वत: त्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार शेजारी राहणार्‍या एका व्यक्तीने पाहिला. महिला पाण्यात बडून वर येत होती. त्याने महिलेला आवाज दिला. परंतु काही झाले नाही. शेवटी त्या व्यक्तीने फोन करून ही माहिती महिलेच्या भावाला दिली. त्याने छतावर धाव घेतली.

त्या वेळी हा प्रकार समोर आला. नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच, लोणीकाळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुले आणि महिलेला बाहेर काढून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करीत आहेत. महिलेने दोन महिन्यांच्या दोन जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारले. त्यानंतर स्वतःदेखील आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिलेला अटक केली असून, पुढील तपास सुरू असल्याचे लोणी काळभोर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT