पुणे

श्रावण मासी हर्ष मानसी ; व्रतवैकल्याचा महिना आजपासून

अमृता चौगुले
पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सण-उत्सवाची रेलचेल…सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमांचा आनंद…अशा आनंददायी, उत्साही वातावरणात गुरुवारपासून (दि.17) श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. अधिक श्रावण महिन्यानंतरच्या या श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी घरोघरी आणि मंदिरांमध्ये जय्यत तयारी  करण्यात आली आहे. श्रावणात पाऊस बरसण्यासह सणासुदींच्या रेलचेलीतून आसमंत चैतन्यदायी आणि प्रफुल्लित होणार आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर पूजनासह हा महिना सण-उत्सवांचा असणार आहे. नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती… अशा सणासुदीच्या रेलचेलीतून सगळीकडे आनंद बहरणार आहे. याशिवाय वास्तूशांती, भूमिपूजन, नवीन व्यवसायाला सुरुवात, नवीन वस्तू खरेदीचे मुहूर्तही गाठता येणार आहे.
यंदाच्या वर्षी अधिक मासाचा योग जुळून आला आणि यंदा 18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत अधिक श्रावण मास होता. तर अधिक श्रावण मासानंतरच्या श्रावण मासाला गुरुवारपासून सुरुवात होत असून, हा महिना सण-उत्सवांचा आणि नवीन कार्याच्या सुरुवातीचा असणार आहे. श्रावण महिन्यात शिवपूजेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील दर सोमवारी शिवमंदिरांमध्ये शिवउपासना करण्याची प्रथा आहे. म्हणूनच श्रावणी सोमवारच्या निमित्ताने शहरातील महादेवाच्या मंदिरामध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे. मंदिरांमध्ये दिवसभर भाविकांना दर्शन घेता येणार आहे आणि यानिमित्ताने भजन-कीर्तनासह विविध कार्यक्रम होणार आहेत.
नवविवाहित महिला श्रावणातल्या दर मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करणार असून, फुगड्या, झिम्मा असे विविध खेळ खेळत मंगळागौरीची रात्र जागविली जाणार आहे. नागाच्या प्रतिमेचे पूजन करून नागपंचमी साजरी होणार असून, भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा दिवस मोठ्या आनंदात कुटुंबांमध्ये साजरा केला जाणार आहे. तसेच, श्रीकृष्ण जयंती, गोपालकाला आणि पोळा हे सणही साजरे होणार आहेत.
या महिन्यात सणासुदींची रेलचेल असल्यामुळे हा महिना प्रत्येकात उत्साह आहे. याशिवाय  श्रावणात लघुरुद्र, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती असे विविध धार्मकि कार्यक्रम-पूजा होणार आहेत. यासाठी गुरुजींकडे दूरध्वनीद्वारे वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी मंगळागौरचे कार्यक्रम, श्रावण गीतांचे कार्यक्रम, भजन-कीर्तन, प्रवचनांचे कार्यक्रमही होणार आहेत.फ
श्रावण महिना सण-उत्सवांचा असणार आहेच. त्याशिवाय या महिन्यात नवीन कार्यास सुरुवात करता येणार आहे. वास्तुशांती, भूमिपूजन, नवीन वस्तू खरेदीचे मुहूर्त गाठता येतील. या महिन्यात काही धार्मिक विधीही करता येणार आहेत.
                                                                                                  – मोहन दाते,  दाते पंचागकर्ते.
SCROLL FOR NEXT