पुणे: राज्यातील हवेचा दाब वाढल्याने मान्सून गत चार दिवसांपासून महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, सोलापूर आणि अहिल्यानगर भागातच अडखळला आहे. पाऊस थांबल्याने कमी झालेल्या कमाल तापमानात पुन्हा 4 ते 6 अंशांनी वाढ होताना दिसत आहे.
राज्यात कोकणात हलका पाऊस अधूनमधून सुरू असून, उर्वरित सर्वच भागांत तो पूर्णपणे थांबला आहे, असे वातावरण 6 जूनपर्यंत राहणार आहे. बांगलादेश किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पूर्वोत्तर भारतात पाऊस वाढला आहे. (Latest Pune News)
महाराष्ट्र वगळता सर्वत्र ‘यलो अलर्ट’ आहे. मात्र, हा पाऊसदेखील 3 जूनपासून कमी होत असून, 6 जूनपर्यंत देशात कुठेही मोठ्या पावसाचा अंदाज नाही, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पारा 22 वरून पुन्हा 32 ते 38 अंशांवर ....
राज्यात 17 ते 27 मे या दहा दिवसांत अतिवृष्टी झाल्याने मेमध्येच तापमानाचा पारा 40 ते 43 अंशावरून थेट 18 ते 22 अंशांवर खाली आला होता. महाबळेश्वरचे कमाल तापमान 19 तर किमान 17 अंशांवर खाली आले होते.
मात्र, गत 24 ते 48 तासांत वातावरण बदलले आहे. पाऊस पूर्ण थांबताच घटलेल्या कमाल तापमानाचा पारा राज्यात पुन्हा एकदा 32 ते 38 अंशांवर गेला आहे. शनिवारी राज्याचे सरासरी कमाल तापमान 32 ते 34 अंशांवर होते. सर्वाधिक तापमान जळगाव येथे 38.2 अंश सेल्सअस इतकी नोंद झाली आहे.
अशी राहील जून महिन्यात स्थिती...
- 1 ते 3 जूनपर्यंत ईशान्येकडील राज्ये आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
-पुढील तीन ते चार दिवसांत वायव्य भारतात गडगडाटी वादळे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
- 2 ते 3 जून रोजी कोकण आणि गोवा या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
- मान्सून महाराष्ट्रात 6 जूनपर्यंत पुढे सरकरण्याची शक्यता कमी असून सध्या तो मुंबई, पुणे, अहिल्यानर भागात सुप्त स्थितीत आहे.
शनिवारचे कमाल तापमान...
मुंबई (कुलाबा) 33.2, सांताक्रूझ 33.7, रत्नानगरी 32.0, पुणे 32.5, अहिल्यानगर 33, जळगाव 38.2, कोल्हापूर 31, महाबळेश्वर 23.8, मालेगाव 36.6, नाशिक 32.1, सांगली 32.4, सातारा 32.2, सोलापूर 34.2, धाराशिव 31.1, छ. संभाजीनगर 34, परभणी 34.4, बीड 34.5, अकोला 36, बुलढाणा 32.8, ब्रह्मपुरी 38, चंद्रपूर 35, गोंदिया 36.6, नागपूर 37, वाशिम 34.4, वर्धा 34.5, यवतमाळ 33.4.