पुणे

ताथवडेतील अशोकनगर झोपडपट्टीची दयनीय अवस्था,  महिलांची होतेय कुचंबणा

अमृता चौगुले

ताथवडे : अशोकनगर येथील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहरातील जुन्या झोपडपट्टीपैकी एक असणार्‍या या झोपडपट्टीचा विकास खुंटला असून, प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. नुकताच जागतिक शौचालय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत 19 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतभर 'स्वच्छता दौड' आयोजित केली होती. यामध्ये अनेक खेळाडू, सेलिबि—टी, नामांकित व्यक्ती, प्रभावशाली व्यक्ती सहभागी झालेल्या दिसल्या. शहरी भागातदेखील जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले होते. महापालिकेमार्फत विविध चौकात, गर्दीच्या ठिकाणी फिरते शौचालय ठेवण्यात आलेले होते. परंत, ताथवडेतील स्वच्छतागृहाकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

काही शौचालयांना दरवाजाच नाही

साधारणतः शंभर घरे आणि पाचशे लोकवस्तीच्या या झोपडपट्टीसाठी दहा वर्षांपूर्वी एका खासगी जागेवर सेवा रस्त्याच्याकडेला पुरुषांसाठी तीन व महिलांसाठी तीन अशी केवळ सहा शौचालये बांधण्यात आलेली आहेत. त्यापैकी काही शौचालयांना दरवाजेही नाहीत, तर काही शौचालये ही अस्वच्छ आहेत. रस्त्याच्या बाजूला ही शौचालये असल्याने येथील आजूबाजूला बांधकाम प्रकल्पावरील काम करणारे परप्रांतीय मजूर आणि रस्त्यावरून जाणारे प्रवासीदेखील याच शौचालयाचा वापर करतात. त्यामुळे या शौचालयावरील ताण वाढत आहे.

विजेच्या खांबावरील दिवे गायब

येथील विजेच्या खांबावरील दिवे गायब झाले असून, यामुळे रात्रीच्या वेळी महिला येथे जाण्यासाठी संकोच करतात. काहीप्रसंगी छेडछाडीचे प्रकारही घडले आहेत. आजूबाजूला वाढलेल्या गवतामुळे सरपटणार्‍या प्राण्याचा धोकाही संभवतो. सकाळच्या वेळी गर्दी वाढल्याने काही वेळा किरकोळ भांडणाचे प्रकारही येथे घडले आहेत.

प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

पंतप्रधान शौचालय योजनेतून प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जात होते. परंतु, अशोकनगर झोपडपट्टीतील अरुंद चाळ, घरासमोरील अंगणात जागेची कमतरता, लहानशी घरे यामुळे येथील बहुतांश कुटुंबाला शौचालय नाहीत. त्यामुळे येथील रहिवाशांसाठी बांधलेली सहा शौचालये अपुरी पडत आहेत. प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे.

एवढ्या मोठ्या लोकवस्तीसाठी केवळ सहा शौचालये आहेत. शौचालयांची साफसफाई वेळेवर होत नाही. महापालिकेची गाडीही कधीतरी साफ करण्यासाठी येते. त्यामुळे आम्हाला शौचालय वाढवून मिळावेत. तसेच, महापालिकेने स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे.
      – पूनम असावरे, स्थानिक रहिवाशी, अशोकनगर

SCROLL FOR NEXT