पुणे

पुणे : मेट्रो प्रवासाची क्रेझ ओसरली; स्टेशनवर शुकशुकाट

अमृता चौगुले

आशिष देशमुख/ प्रसाद जगताप

पुणे : शहरातील नव्या मेट्रोतून प्रवासाची हौस अवघी आठ महिनेच टिकली. आता या स्थानकांवर चक्क शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. प्रवासीच नसल्याने मेट्रोलाच प्रवाशांची वाट पाहावी लागत असल्याचे चित्र रविवारी (दि. 13) पाहायला मिळाले. टीम 'पुढारी'ने गरवारे मेट्रो स्थानक ते वनाज, असा दुहेरी प्रवास करून मेट्रोचा आँखो देखा हाल जाणून घेतला.

रविवारी सायंकाळी 5 वाजता प्राइम टाइममध्ये टीम 'पुढारी'ने हा प्रवास केला तेव्हा असे लक्षात आले की, गरवारे स्थानकावर चार ते पाच प्रवासी सुरुवातीला आले. हा आकडा अर्धा तास थांबल्यावर 20 प्रवाशांवर गेला. साडेपाच वाजता वनाजकडून धीम्या गतीने मेट्रो प्रवाशांना घेऊन आली. पुन्हा तेच प्रवासी पिकनिक मूड असल्याने नवीन प्रवाशांना घेऊन मेट्रो वनाजकडे निघाली.

सेल्फी अन् प्रवासाची क्रेझ कमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 मार्च 2022 रोजी या मेट्रोचे उद्घाटन केले. त्यानंतर सलग तीन ते चार महिने पुणेकरांसह पर्यटकांकडून मेट्रो स्टेशनवरचे वातावरण, तिकीट काउंटरवरील फोटो सेशनसाठी गर्दी व्हायची. मात्र, दिवाळीनंतर मेट्रोच्या प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली असून, आता ही पिकनिक करणार्‍यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. यात सेल्फीसह प्रवासाची क्रेझही कमी झाल्याचे दिसले.

ज्या स्थानकावर मेट्रो थांबत आहे, त्या ठिकाणी पीएमपीने प्रवाशांच्या सोयीसाठी फीडरसेवा सुरू केली होती. कारण, मेट्रोचा प्रवास केल्यावर रिक्षाची गरज पडू नये, पुढचा प्रवास देखील स्वस्त व्हावा, अशी भूमिका होती. मात्र, मेट्रोचे जाळे अजून पूर्णपणे विस्तारले नसल्याने सध्या गरवारे कॉलेज ते वनाज याच अंतरावर मेट्रो धावत आहे. त्यामुळे पीएमपीला फीडरसेवेसाठी प्रवासी नसल्याने ती बंद करावी लागली.

ई-सायकलींना मागणी नाही…
गरवारे स्थानकाच्या खाली प्रवाशांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी ई-सायकलची व्यवस्था करून देण्यात आली आहे. मात्र, सायकललाही प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नाही, असे दिसले. स्थानकावर या सायकल धूळ खात पडून आहेत. एखादाच जिज्ञासू प्रवासी ही सायकल भाड्याने हौस म्हणून घेऊन जात असल्याचे दिसले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT