पुणे: पुण्याची वाढणारी हद्द आणि भविष्य काळातील लोकसंख्या लक्षात घेऊन आतापासूनच पाण्याची बचत न केल्यास भविष्यात पुणेकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळेच ’पाणी बचाव, भविष्य बचाव...,’ ’जल है तो कल है...’असा संदेश देण्याची गरज निर्माण झाली आहे.
रविवारी (दि.23) दै. ’पुढारी’ माध्यम समूह आणि ’पुढारी कस्तुरी क्लब’ने आयोजित केलेल्या महिलांच्या भव्य बाईक रॅलीत पुणेकर महिला मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाणी बचतीचा महत्त्वपूर्ण संदेश देणार आहेत. महिला पाणी बचतीचे आवाहन करणार आहेत. गुढीपाडव्यानिमित्त पुण्यात या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक पुढारी माध्यम समूह आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने महिलांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून यंदाही महिलांच्या बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने ही बाईक रॅली होणार असून, पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नगर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांतून 23 मार्च रोजी एकाच दिवशी ही रॅली आयोजित केली आहे.
पुणे शहरातील या रॅलीत महिला पाणी बचतीचा महत्त्वाचा संदेश देणार आहेत. डॉक्टर असो वा वकील...आयटी क्षेत्रातील नोकरदार असो वा गृहिणी...अशा विविध क्षेत्रातील महिला या रॅलीत सहभागी होणार आहे. पर्वती येथील मित्रमंडळ चौकातील पुढारी भवन येथून सकाळी साडेसात वाजता बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे.
’पाणी हेच जगणे...पाण्याचा अपव्यय टाळा...’असे संदेश असलेले फलक हातात घेऊन महिला पाणी बचतीचा संदेश देणार आहेत. रॅलीसाठी पारंपरिक वेशभूषा, पांढरा कुर्ता-जीन्स, लाल ओढणी हा ड्रेस कोड असणार आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड हे रॅलीचे फायनान्स पार्टनर आहेत.
रॅलीत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे आणि नोंदणी करणे आवश्यक आहे. या भव्य रॅलीत शहरातील महिला आणि महिलांसाठी काम करणार्या संस्थांनी ग्रुपने सहभागी व्हावे. सहभागी होण्यासाठी 7040848572 किंवा 7972252835 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.