पुणे: बलात्कार पीडितांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणीदरम्यान हेळसांड होत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातच त्यांच्या वैद्यकीय चाचणीलाही दोन ते तीन दिवस लागत असल्याने ही वैद्यकीय चाचणी एका दिवसातच पूर्ण करण्याच्या दृष्टीतकोनातून ससून रुग्णालयाने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.
दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी (दि.7) सकाळी पुण्यातील महिला सुरक्षेच्या द़ृष्टीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमवेत बैठक घेतली. त्या वेळी अमितेश कुमार यांनी ही माहिती चाकणकरांना देताना, याची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले.
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील पीडितेला ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी तीन दिवस ताटकळत थांबविण्यात आले होते. हा प्रकार पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यल्लाप्पा जाधव यांना ही माहिती दिली. त्यानंतर पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील तरुणीची ससून रुग्णालयात झालेली वैद्यकीय चाचणी महिला डॉक्टरने केली नाही, हा मुद्दा पुढे आल्यानंतर पोलिस आयुक्तांनीही याला तितकेच महत्त्व दिले आहे.
ससून रुग्णालयात पीडितेची वैद्यकीय तपासणी करताना ही तपासणी महिला डॉक्टरकडूनच करण्यात यावी. बलात्कार पीडितांची तपासणी करण्यासाठी त्या ठिकाणी महिला डॉक्टर आणि नर्स उपलब्ध असव्यात. महिला डॉक्टर उपलब्ध नसेल तर दुसर्या रुग्णालयात अशा पीडितांची वैद्यकीय चाचणी व्हावी. पीडितांवर करण्यात येणारे उपचार आणि त्यांची होणारी वैद्यकीय चाचणी ही वेगवेगळी ठेवावी. या ठिकाणीही महिला डॉक्टर्स, नर्स उपलब्ध असाव्या. शक्यतो एकाच ठिकाणी पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात यावी, असाही उपाय आयुक्तांनी सुचविला.
हॉटस्पॉटच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणार
महिला सुरक्षेच्या दृष्टीने बोपदेव घाटासह गुन्ह्यांचे जे हॉटस्पॉट आहेत, त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तसेच, सुरक्षारक्षक असावे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. शहरातील 284 ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्याचे प्रस्तावित असल्याचेही आयुक्तांनी सुरक्षेच्या आढावा बैठकीत महिला आयोगाच्या अध्यक्षांना माहिती दिली. महापालिकेला तशा सूचना केल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.