पारगाव : पुढारी वृत्तसेवा : कांद्याच्या बाजारभावात पुन्हा घसरण झाली आहे. त्यातच आता आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांशी बराकींमधील कांद्याला कोंब फुटल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी तराळले आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात वाढ केल्याने शेतकर्यांच्या जखमांवर अक्षरश: मीठ चोळले गेले आहे. मागील आठवड्यात कांद्याचे दर वाढले होते. मंचर येथील बाजार समितीत त्या वेळी कांद्याला 10 किलोला 325 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला होता. त्यानंतर मंचर, लोणी, ओतूर, आळेफाटा येथील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली होती. परंतु कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली.
बराकीत साठविलेल्या कांद्यावर दूषित हवामानाचा परिणाम झाल्याने कांदा मोठ्या प्रमाणावर सडला. त्याचाही परिणाम बाजारभावावर झाला. आता चांगल्या प्रतीचा कांदा शेतकर्यांकडे शिल्लक नाही. कांदा बाजारपेठेत पाठविण्याअगोदर प्रतवारी करताना सडलेले कांदेच अधिक प्रमाणात निघत आहेत. या परिसरात मध्यंतरी रिमझिम पाऊस सलग 15 ते 20 दिवस पडला. त्यामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाणदेखील वाढले. सध्या पारगाव, शिंगवे, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे आदी गावांमधील शेतकर्यांच्या बराकीमधील कांद्याला आता कोंब फुटल्याचे दिसत आहे. नजीकच्या काळात कांदे विकल्याशिवाय शेतकर्यांपुढे पर्याय नाही.
सोशल मीडियावर मोदी सरकारविरोधी संताप
कांद्याच्या निर्यात शुल्क दरात वाढ केल्याने ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकर्यांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला आहे. टॉमेटो बाजारभाव पाडून आता कांद्याच्या निर्यात शुल्क दरात वाढ केली आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांना अडचणीत आणल्याबद्दल मोदी सरकारचे जाहीर आभार मानल्याचे अनेक मिम्स, संदेश तयार व्हायरल केले जात आहेत.
केंद्र सरकारनेदेखील आता कांदा उत्पादक शेतकर्यांना अडचणीत आणले आहे. कांदा निर्यात शुल्क आता 40 टक्के केले आहे. निर्यात शुल्क दरात वाढ झाल्याने व्यापारी शेतकर्यांकडून कमी दरानेच कांदा खरेदी करतील. कांद्याच्या बाजारभावात वाढ होत असतानाच केंद्र सरकारने निर्यात शुल्क दरात वाढ करून कांदा उत्पादक शेतकर्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे.
– तबाजी लोखंडे, कांदा उत्पादक शेतकरी, वळती