पुणे

पिंपरी : ख्रिसमस सेलिब्रेशनची जय्यत तयारी बाजारपेठ झाली रंगबेरंगी

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  नाताळ म्हणजे मानव जातीच्या उद्धार व कल्याणासाठी परमेश्वराने केलेले प्रेम दर्शवणारा महोत्सव आहे. नाताळ सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमसच्या सेलिब्रेशन  जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला  मिळत आहे. नाताळनिमित्त विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली असून ख्रिस्तीबांधवांनी सणाची जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरातील बाजारपेठा, दुकाने व मॉल्स विविध प्रकारांच्या वस्तू, सांता टोपी, बेल्स, ख्रिसमस ट्री, गिफ्ट पॅकेजसह, लहान मुलांसाठी बाजारात सांताक्लॉजसारखे ड्रेस, कानटोपी, ग्लोज, शूज, पोतडी बॅग्जही आल्या आहेत. बच्चे कंपनीत सांताक्लॉजचे खास आकर्षण असून चॉकलेट, गिफ्ट घेऊन येणार्‍या सांताक्लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यांची खरेदी होत आहे.

ख्रिसमस ट्री, स्टार

नाताळची चाहूल देणारी गोष्टी म्हणजे ख्रिसमस ट्री व चांदण्यांच्या आकारातील आकाशकंदील म्हणजेच स्टार. घरातील सजावटीबरोबरच ख्रिसमस ट्रीच्या सजावटीसाठी लागणार्‍या वस्तू, चांदण्या, चॉकलेट्स, झालर, बेल्स, सांताक्लॉजच्या मूर्ती, आकाशकंदील, रोषणाई व सजावटीचे साहित्य, भेटवस्तू, यांनी अनेक दुकाने सजली असून, खरेदीसाठी स्ट्रीट शॉपिंग आत्तापासूनच केली जात आहे. हे ख्रिसमस ट्री 100 पासून ते 5 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

गव्हाणी व हरिणांचा रथ

ख्रिसमससाठी ख्रिस्तीबांधव खास गव्हाणी तयार करून त्यामध्ये पुतळे ठेवून रात्री बारा वाजता ख्रिसमस साजरा करतात. बाजारात लाकडापासून रेडिमेड अशा गव्हाणी आणि हरिणाच्या जोड्यांचे रथ विक्रीस ठेवले आहेत. 500 ते 3 हजार रुपयांपर्यंत ही गव्हाणी उपलब्ध आहे. तसेच छोट्या आकारातील स्वस्त अशा सिरॅमिकच्या गव्हाणीदेखील उपलब्ध आहेत.

केक शॉप व मॉल्स

शहरातील केकशॉप, मॉल्स, सुपर मार्केटसच्या बाहेर स्वागतासाठी उभे असलेले सांताक्लॉज, प्रत्येक चौकात सांताक्लॉजच्या टोप्यांचे आणि वेषभूषेचे स्टॉल, याकडे कुतूहलाने पाहणारी बच्चेकंपनी असे दृश्य पिंपरी विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे. केकच्या ऑर्डर देण्यासाठी तसेच केकचे साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमसच्या स्वागतासाठी झुंबड उडाली आहे.

ख्रिसमसचा फराळ करण्याची लगबग

ख्रिसमससाठी ख्रिस्तीबांधव हे वेगवेगळ्या प्रकारचे केक बरोबरच डोनट, रोज कुकीज, नानकटाई असे पदार्थ तयार करतात. हा फराळ बाजारात रेडिमेडदेखील उपलब्ध असतो. यामध्ये डोनट हा स्पेशल असणारा पदार्थ आता चॉकलेट, व्हॅनिला, मँगो अशा विविध फ्लेव्हर्समध्ये उपलब्ध असतो.

कॅरल सिंगिंगमुळे वाढता उत्साह
ईश्वराने मानवांच्या उद्धारासाठी मानवरूप धारण केले. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ख्रिस्तीधर्मियांत ख्रिसमसच्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वीच कॅरल सिंगिंग म्हणजेच नाताळ गाणी गाण्यास प्रारंभ होतो. ख्रिस्तीबांधव सध्या एकमेकांच्या घरी भेट देऊन नाताळ गाणी गात एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देत आहेत. ख्रिस्ती समाजामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जाणारा नाताळ काही दिवसांवर आला आहे. शहरातील चर्चमध्ये नाताळची तयारी करण्यात आली असून, नाताळच्या स्वागताची तयारी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. शहरातील चर्चमध्ये नाताळनिमित्ताने विविध कार्यक्रमांची तयारी सुरू आहे.

कॅरल सिंगिग हा ख्रिसमसच्या आनंदोत्सवातील एक उल्लेखनीय उपक्रम असतो. वेगवेगळ्या चर्चचे ग्रुप समाजबांधवांच्या घरी जाऊन, त्यांना गीतांच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. वाद्यांच्या तालावर देवाची भक्ती, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी गीते या वेळी सादर केली जातात. त्यामुळे ख्रिस्त बांधव सध्या घरी येणार्‍या सांताक्लॉजरूपी कॅरलचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत. खास नाताळसाठी म्हणून भक्तिगीते रचली जातात. त्यांना ख्रिसमस कॅरोल्स असे म्हणतात. ती गात लहानमुले, युवकयुवती रात्रीपासून ते पहाटेपर्यंत एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT