पुणे

पुण्यातील नवले पुलावर आता ‘पंचसूत्री’ची मलमपट्टी ! वेगमर्यादा 60 वरून 40 करणार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  वारंवार अपघातांचे केंद्रबिंदू ठरलेल्या नवले पुलावर आता पंचसूत्रीचा उपाय चौकशी समितीने सुचविला आहे. वाहतुकीत अडकल्यावर आपत्कालीन सुटकेचा मार्ग, जड वाहनांना वेगमर्यादा, गर्दी छेदत जाऊन मदत करणारी वाहतूक व्यवस्था, वेगावर नियंत्रणासाठी रम्बलरची संख्या वाढविणे, जड वाहनांना रोखण्यासाठी उंच बॅरिकेड, अशी ही पंचसूत्री आहे.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर स्वामीनारायण मंदिराजवळ 23 एप्रिल रोजी पहाटे ट्रक आणि खासगी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या पार्श्वभूमीवर अपघाताची कारणे आणि उपाययोजनांसाठी चौकशी समिती नेमली होती. या समितीने जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर केला आहे. या वेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे आदी अधिकार्‍यांसह 'सेव्ह लाइफ फाउंडेशन' या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

समितीने नोंदविलेली निवडक निरीक्षणे…
या पुलावर उतार असल्याने गाडीचे इंजिन बंद करून इंधन वाचवण्याचा प्रयत्न चालक करतात.
गाडी एकदा न्यूट्रल गीअरमध्ये टाकली की तिच्यावरचे चालकाचे नियंत्रण सुटते
न्यूट्रल गीअरमध्ये सतत ब्रेक दाबल्याने त्या यंत्रणेतील उष्णता वाढते. दाब निर्माण झाल्याने ब्रेक निकामी होतात.

जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका…
कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवणे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस चौकी स्थापन करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (पीएएस) कार्यान्वित केली जाणार आहे. तातडीची मदत देण्यासाठी पोलिस चौकीजवळ क्रेन तैनात ठेवली जाणार आहे.

वाहतूक छेदून मदत करणारी यंत्रणा…
या ठिकाणी वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्‍या वाहनांना तातडीने रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेला एक आणि ग्रामीण पोलिसांना एक अशी दोन इंटरसेप्टर वाहने (वाहतूक छेदून मदत करणारी यंत्रणा) जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिली जाणार आहेत. तसेच महामार्गावर सीसीटीव्हीची स्वतंत्र यंत्रणा राहील.

अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांतर्गत कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, त्या अनुषंगाने लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांची बैठक होणार आहे.
                                     – संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआय

कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान अपघात टाळण्याच्या अनुषंगाने जड वाहनांसाठी वेगमर्यादा घटविणे आवश्यक असल्याचे सुचविण्यात आले आहे. सध्या वेगमर्यादा 60 असून, ती 40 केली जाणार असून, त्यासाठी आदेश जारी केले जातील. त्यापूर्वी ट्रकमालक संघटनांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.
                                               – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

SCROLL FOR NEXT