पुणे

माळीणची 9 वर्षं : आजही अंगावर येतात काटे..! गाळातून जावे लागते शेतीत

अमृता चौगुले

भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा : निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला दि. 30 जुलै रोजी 9 वर्षे पूर्ण झाली. या दुर्घटनेत 44 कुटुंबांतील 151 लोक दगावले. त्यानंतर आंंमडे गावच्या हद्दीत नवीन माळीण गाव वसविण्यात आले. येथे 68 घरे बांधण्यात आली. 1 एप्रिल 2017 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याचा लोकार्पण सोहळा
झाला व लोकांना नवीन घरे देण्यात आली. परंतु, मोठा पाऊस पडला की अंगावर तर्कन काटे येतात आणि जुन्या आठवणी ताज्या होतात व तो दिवस डोळ्यांसमोर येतो.

नवीन पुनर्वसन गावठाणात घरांना कोणताही धोका नाही. परंतु, घरांचे छत व भिंती आजही पाझरत आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या मात्र कायम आहे. माळीण पुनर्वसन गावासाठी करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेला आजही पुरेसे पाणी नाही. भर उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या पावसाळ्यातही पुरेसे पाणी येत नसून 9 ते 10 दिवसांनी पाणी येते. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करीत हातपंपाचा आसरा घ्यावा लागत आहे. नदीतील विहिरीला आडवे बोअर मारले तर पाणी मिळू शकते तसेच शेताकडे जाण्यासाठी जुन्या माळीण गावठाण पलीकडील वाड्या-वस्त्यांवर शेती असल्याने रस्त्याची फार मोठी गैरसोय होत आहे.

यामुळे पाण्या-पावसात गाळातून जावे लागते. अनेक वर्षे मागणी करूनही रस्ता केला गेला नाही, असे कमाजी पोटे यांनी सांगितले. नवीन गावात आम्हाला घरे मिळाले नाहीत, अशी तक्रार कमल जनार्दन लेंभे व अनसाबाई भीमराव झांजरे या कुटुंबाने मांडली. त्यांचे माळीणमध्ये सामाईक घर होते. दुर्घटनेच्या काही दिवस अगोदर नवीन घर बांधून पूर्ण झाले होते. या घराची नोंद ग्रामपंचायतदफ्तरी घातली नव्हती. नवीन पुनर्वसन गावठाणात दिराला घर मिळाले; मात्र त्यांच्या घराची नोंद नसल्याने त्यांना घर मिळाले नाही.

महिलांनी मांडली व्यथा
आपली कैफियत मांडताना कमल लेंभे व अनसाबाई झांजरे म्हणाल्या की, आमचा विचार कोणीच करीत नाय. आम्ही जिवंत हाय की मेलोय, हे पाहायला बी कुणी येत नाय. घरकुलाला गावात आमच्याकडे जागा पण नाय, जी जाग आहे ती शेताकडं, तिकडं डोंगराकडं आम्ही एकटं कसं राहणार. पुढं आमचं काय होईल, अशी टोकाची प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT