पुणे

पुणे : वाहतूक कोंडीसाठी आता प्रभारींना जबाबदार धरणार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वाहतूक कोंडीला आता केवळ वाहतूक विभागच जबाबदार राहणार नसून, स्थानिक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिका़र्‍याला देखील तेवढेच जबाबदार धरले जाणार आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत, तर त्यांना थेट ट्रॅफिक विभागालाच संलग्न करण्याची तंबी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्यांना वाहतुकीची जबाबदारी झटकता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

बुधवारी (दि. 2) पोलिस आयुक्तालयात झालेल्या आढावा (डब्ल्यूआरएम) बैठकीत शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. पुढील कालावधीत वाहतूक कोंडी कशाप्रकारे कमी करता येईल, कोणते बदल करणे आवश्यक आहे, यासह अनेक विषयांचा आढावा घेण्यात आला. या वेळी वाहतूक विभागाच्या वतीने केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. या प्रसंगी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

एका बाजूला शहरातील कायदा व व्यवस्था सुस्थितीत असताना केवळ वाहतूक कोंडीमुळे पोलिसांना नागरिकांच्या टीकेचे धनी व्हावे लागत असल्याचे चित्र आहे. अप्रत्यक्षपणे याचे खापर पोलिस आयुक्तांवरच फुटत असल्याने पोलिस आयुक्तांनी ही गोष्ट तेवढ्याच गांभीर्याने घेतली आहे. याचाच प्रत्यय बुधवारी झालेल्या आढवा बैठकीत पाहायला मिळाला.

वाहतूक विभागाविषयीचे नाराजीचे सूर याही बैठकीत उमटले. सर्व बैठकच शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाभोवती झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या वेळी पोलिस आयुक्त आणि सहपोलिस आयुक्तांनी सर्वांना फैलावर घेत वाहतुकीबाबात काम करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना देखील विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात जर वाहतूक कोंडी झाली, तर त्या अधिकार्‍याने आपले काम गुन्हे निरीक्षकाकडे सोपवून वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर प्रभारी अधिकार्‍यांनी गांभीर्याने याबाबत काम केले नाही तर त्यांना थेट वाहतूक विभागात पाठविण्यात येण्याची तंबी देण्यात आली आहे. तसेच, आत्तापर्यंत स्थानिक पोलिस ठाणे व मुुख्यालयाकडून वाहतूक पोलिसांच्या मदतीला देण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना 31 डिसेंबरपर्यंत तेथेच ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT