भोर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भोरमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 1999चा बदला घेण्याची वेळ आली असल्याची साद घालत तटकरे यांनी थोपटे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. बारामती लोकसभा मतदारसंघात या वेळी पवार विरुद्ध पवार अशी जोरदार लढत होत असून, ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका राहणार आहे, त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळी थोपटे यांच्या भेटी घेऊन त्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती, त्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीदेखील थोपटे यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी 40 वर्षांचे राजकीय वैर बाजूला ठेवून अनंतराव थोपटे यांची संगमनेर-माळवाडी (ता. भोर) येथे भेट घेतली होती.
महायुतीच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार असून, मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, या भेटीमागे कोणतेही राजकारण नसून, फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी थोपटेंना भेटण्यासाठी आलो.
विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्यावर पुरंदर-हवेलीतील उमेदवाराने खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्या वेळी शरद पवार यांच्यावरील आरोप पुसून काढण्यासाठी अजित पवारांनी त्या उमेदवाराचा पराभव केला होता. आता जरी ते गरजले, तरी ते या निवडणुकीच्या भानगडीत पडतील का, अशी टीका सुनील तटकरे यांनी विजय शिवतारे यांचे नाव न घेता केली.
हेही वाचा