पुणे

पीएमआरडीएच्या सर्वंकष वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी अपूर्ण

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने पुणे शहरालगत वेगाने वाढणार्‍या उपनगरांच्या तयार करण्यात आलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील काम संथगतीने सुरू आहे. मेट्रोचे काम अर्धवट पूर्ण झाले आहे. नियोजित वर्तुळाकार रेल्वरमार्गाच्या कामाला मुहूर्तच सापडलेला नाही. बीआरटीएस मार्गाची कामे मात्र बहुतांश पूर्ण झाली आहते. रूंद पदपथ, सायकल ट्रॅक, सुरक्षित पादचारी क्रॉसिंग व सक्षम सिग्नल यंत्रणा उभारण्याचे काम पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आवश्यकतेनुसार विविध भागांमध्ये केले जात आहे.

पीएमआरडीएकडून 2018 मध्ये पुढील 20 वर्षांचा सर्वकष वाहतूक आराखडा पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एकूण 542 चौरस किलोमीटर क्षेत्राचा या आराखड्यात समावेश आहे. त्याशिवाय, उर्वरित पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, हवेली, खेड, शिरूर, दौंड, पुरंदर, भोर व वेल्हा आदी तालुक्यांचा समावेश केला आहे. एकूण 2 हजार 172 चौरस किलोमीटर क्षेत्रफळासाठी हा वाहतूक आराखडा तयार केलेला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, रेल्वे विभाग, पुणे आणि ग्रामीण पोलिस, वाहतूक विभाग, तीन कॅन्टोमेंन्ट विभागाचे अधिकारी तसेच नगरपालिकांच्या मदतीने हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

अल्प, दीर्घकालीन नियोजन गरजेचे
पीएमआरडीएने तयार केलेला आराखडा पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, रेल्वे तसेच संबंधित सर्व आस्थापनांना यापूर्वी पाठविलेला आहे. पीएमआरडीएकडून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे, शिवाजीनगर-लोणी काळभोर मेट्रोसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला आहे. रेल्वेकडून वर्तुळाकार रेल्वे मार्गासाठी तर, महामेट्रोकडून लाईट मेट्रो, निओ मेट्रो आदी सेवांसाठी आवश्यक नियोजन होणे गरजेचे आहे.

रिंग रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया अपूर्ण
पीएमआरडीएकडून उभारण्यात येत असलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंग रोड) पहिल्या टप्प्यातील कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भूसंपादन प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले आहे. 40 गावे जोडणार्‍या आणि 83.12 किलोमीटर अंतरातील या रिंग रस्त्याच्या पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदेदरम्यानच्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे.

रेल्वे ट्रॅक कधी होणार ?
पीएमआरडीएच्या वाहतूक आराखड्यानुसार मुळशी तालुक्यातील मळवली येथून सुरू होणारा शंभर किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक (लोकल सेवा) तयार करण्यात येणार होती. प्रस्तावित पुरंदर विमानतळाला सर्व बाजूने वाहतूक मार्ग जोडण्यासाठी 100 किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक (लोकल सेवा) उभारण्यात येणार होता. या मार्गाबाबत सध्या कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. हा मार्ग त्यामुळे कागदावरच राहिला आहे. पर्यायाने, हा रेल्वे ट्रॅक कधी होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT