येरवडा; पुढारी वृत्तसेवा: लोहगाव, वाघोली परिसराचा महापालिकेत समावेश होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यापही जिल्हा परिषदेच्या ताब्यात असल्याने येथील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्या नातेवाइकांना येरवडा येथे महापालिकेच्या दवाखान्यात जावे लागत आहे. ही गैरसोय महापालिकेने दूर करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने माजी उपसरपंच प्रीतम खांदवे यांनी केली आहे.
लोहगावचा महापालिकेत समावेश होऊन पाच वर्षे उलटली आहेत. कोट्यवधी रुपयांचा महसूल महापालिका विविध करांच्या माध्यमातून नागरिकांकडून गोळा करीत आहे. तरीदेखील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधापासून वंचित राहावे लागत आहे. लोहगावमधील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून, मोक्षद्वार समजली जाणारी स्मशानभूमी मद्यपेयी आणि गुन्हेगारांचा अड्डा बनली आहे. तसेच, इतर स्मशानभूमीप्रमाणे या स्मशानभूमीला महापालिकेने रखवालदार देखील नेमला नाही. रखवालदार नसल्याने लोहगावबाहेरील निनावी मृतदेह जाळण्याचे प्रकार या स्मशानभूमीमध्ये होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महापलिका हद्दीत मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीचा मृत्यूचा दाखला देण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असते. परंतु, याबाबत प्रशासन उदासीन आहे. यामुळे मृत्यूचे दाखले आणण्यासाठी मृतांच्या नातेवाउकांना येरवडा अथवा ससून रुग्णालयात जावे लागत आहे. तर नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील सरकारी दवाखाने अद्यापही जिल्हा परिषदेकडून आमच्याकडे हस्तांतरित झाले नाहीत.
त्यामुळे त्या गावातील सरकारी दवाखान्यांतील कर्मचारी आमचा आदेश मानत नसल्याचे उत्तर महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांकडून देण्यात येते. तर जिल्हा परिषदेच्या डीएचओ यांनी महापालिकेला पत्र देऊन मृत्यूचे दाखले प्राथमिक आरोग्य केंद्राकडे द्या. तेथून वाटप केले जातील, असे पत्र पाठविले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे महापालिकेने या विषयात त्वरित लक्ष घालून लोहगावच्या स्मशानभूमीत रखवालदार नेमावा, तसेच मृत्यूचे दाखले देण्याची सोय मृतांच्या नातेवाइकांना लोहगावमध्येच करून द्यावी, या मागणीकडे खांदवे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
महापालिकेकडून हालचाली नाहीत…
जिल्हा परिषदेचे डीएचओ भगवान पवार यांच्या आदेशानुसार आम्ही लोहगाव, वाघोली हद्दीतील नागरिकांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात महापालिकेचा माणूस बसवावा; अथवा मृत्यू पास रजिस्टरसह आपल्याकडे सोपवावे, असे पत्र दिले आहे. मात्र, महापालिकेकडून काही हालचाली झाल्या नसल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रातील डॉ. बळीवंत यांनी सांगितले.
याबाबत लवकरच चौकशी करण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करून मृत्यूचे दाखले जवळ उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात येईल.
डॉ. रेखा लबडे-गलांडे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका