पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आकुर्डी येथील तुळजाभवानी मंदिराच्या बाजूच्या जाहिरात होर्डिंगवरील जाहिरात दिसावी म्हणून समोरील झाड तोडण्यात आले. त्या प्रकरणी काळेवाडी येथील शुभांगी अॅडव्हर्टायझिंगचा अधिकृत परवाना रद्द करण्यात आला आहे. ते होर्डिंग काढून टाकले आहे. अशा प्रकारे विनापरवाना झाडे तोडल्यास होर्डिंग चालक व मालकांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सोमवारी (दि.11) दिली.
महापालिकेस प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार तुळजाभवानी मंदिराच्या बाजूला असलेल्या जाहिरात होर्डिंगसमोरील वृक्षाची छाटणी 23 ऑगस्ट 2023 ला पहाटे केल्याचे दिसून आले. महाराष्ट्र शासन जाहिरात नियमन व नियंत्रण दि. 9 मे 2022 मधील नियम 22 (घ) या नियमाचा भंग केल्याने शुभांगी अॅडव्हर्टायझिंगची परवानगी रद्द करण्यात आली. तसेच, होर्डिंग काढून टाकण्याची नोटीस आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून 5 सप्टेंबर 2023 ला बजावण्यात आली. ते होर्डिंग 8 सप्टेंबरला स्वत:हून काढून टाकण्यात आले.
शहरातील जाहिरात होर्डिंगसमोरील कोणत्याही प्रकारची वृक्ष छाटणी विनापरवाना करू नये. वृक्षाच्या फांद्या कापण्यासाठी उद्यान विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी. अन्यथा महापालिकेकडून जाहिरात होर्डिंग परवाना रद्द करण्यात येणार आहे, असा इशारा उपायुक्त इंगळे यांनी दिला आहे.
हेही वाचा :